Breaking News

शास्त्रज्ञांनी विकसित केले 'लव्ह हार्मोन'चे कृत्रिम रूप.

मेलबर्न : कामाचा रोजच वाढणारा दबाव आणि ताणतणावामुळे मानवाच्या जीवनातून प्रेमजिव्हाळा काहीसा कमी होत आहे. परिणामी कुटुंबातील लोकांमधील अंतर वाढत आहे. मात्र आता शास्त्रज्ञांनी या समस्येवरचा उपाय शोधला आहे. त्यांनी मानवाच्या शरीरात आढळून येणाऱ्या 'लव्ह हार्मोन ऑक्सिटॉक्सिन'ची कृत्रिम आवृत्ती तयार केली असून तिचे कोणतेच दुष्परिणाम नाही.


हा हार्मोन आईवडिलांची देखभाल, भागिदारीतील संबंध, सामाजिक संपर्क, तणाव व चिंता यांसारख्या आपल्या मौलिक सामाजिक वर्तनावर प्रतिक्रिया देतो. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडचे मार्क्स मुटनेथेलर यांनी सांगितले की, ऑक्सिटॉक्सिनचा नकारात्मक पैलू असा की, ते एकाचवेळी अनेक रिसेप्टर्सला सक्रिय करते. त्यामुळे विविध प्रकारचे अनपेक्षित दुष्परिणाम समोर येतात. उदाहरणार्थ प्रसुती वेदना वाढविण्यासाठी बऱ्याचदा ऑक्सिटॉक्सिनचा वापर केला जातो. पण त्याचा डोस जास्त असेल किंवा मग दीर्घकाळ त्याचा वापर केला जात असेल तर गर्भाशय फाटण्याची वा ह्रदयवाहिन्यांशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

शास्त्रज्ञांनी ऑक्सिटॉक्सिनच्या संरचनेत छोटेछोटे बदल करून एक नवीन अणू विकसित केला असून तो रिसेप्टर्सची सक्रियता कमी करतो. त्यामुळे दुष्परिणामही कमी होतात. शास्त्रज्ञांनी विकसित केलेला नवीन संयुग पदार्थ ऑक्सिटॉक्सिन एवढाच प्रभावी आहे, परंतु ऑक्सिटॉक्सिन रिसेप्टरसाठी त्याची निवड उत्तम असून त्यामुळे संभाव्य दुष्परिणामांचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्याच्या वापरामुळे ह्रदयाच्या स्नायूंच्या पेशी सक्रिय झाल्या नाहीत.