Breaking News

दोन वर्षात जिल्ह्यातले अंतर्गत रस्ते अद्ययावत करणार - दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी, दि. 25, डिसेंंबर - येत्या दोन वर्षांत सिंधुदुर्गातील अंतर्गत रस्ते अद्ययावत करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडकमधून अंतर्गत 275 किलोमीटरच्या रस्त्यासाठी कोट्यावधी निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या विविध रस्त्यांची 850 कोटींची कामे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत होणार आहेत अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ इथ पत्रकार परिषदेत दिली. 

पालकमंत्री केसरकर यांनी रविवारी कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली.  पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 275 किलोमीटर रस्ते घेण्यात आले आहेत. रस्त्यामुळे सिंधुदुर्गचा कायापालट होणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम जोराने सुरु आहे. नॅशनल हायवेअंतर्गत 850 कोटी निधी रस्त्यासाठी मंजूर करण्यात येणार आहे. 

यामध्ये बेळगाव, कोल्हापूर जोडणारा सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली, आचरा, कसाल, मालवण या रस्त्यांचा समावेश आहे. लोकांनी रस्त्यासाठी सहकार्य केल्यास वेंगुर्ले ते दाणोली हा रस्तासुद्धा घेण्यात येईल. राष्ट ्रीय महामार्गामुळे 40 हजार झाडे तुटत आहेत. निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. हा फलोद्यान जिल्हा आहे. सावली आणि फळे देणारा जिल्हा आहे याचा विचार करून अशी झाडे लावली जातील. शासनाच्या वतीने प्राधान्याने रोपे उपलब्ध केली जातील.