Breaking News

मशीनचा मशीनशी संवाद होऊन सहज कामे होणार : मेंगवडे


प्रवरानगर प्रतिनिधी :- कार्यक्षमता वाढविण्यासाठी संगणकाच्या वापरामुळे नोकऱ्यांवर गदा येईल, म्हणून ८० च्या दशकाच्या सुरवातीला भारतामध्ये या तंत्रज्ञानावर बंदी होती. मात्र १९८४ साली स्व. राजीव गांधी यांनी संगणक धोरण जाहीर केले. आज कॅशलेस व्यवहारापर्यंतच्या झालेल्या प्रगतीचे आपण साक्षीदार आहोत. तंत्रज्ञानामुळे इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत की, त्यावर आपला विश्वासही बसत नाही. आता इंटरनेट ऑफ थिंग्स ( आय ओ टी) या नव्या तंत्रज्ञनाचा उंबरठ्यावर आपण उभे आहोत. यामध्ये मशीनचा मशीनशी संवाद होऊन मानवाची कित्येक कामे सहजसोपी होणार असल्याचे ‘ओपस सॉप्टवेअर सोल्युशन’चे अध्यक्ष रमेश मेंगवडे यांनी सांगितले. 
पद्मश्री विखे पाटील स्मुति- व्याख्यानमालेत 'यशोगाथा' या विषयावर ते बोलत होते. सात दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेचा काल {दि.१६} समारोप झाला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के अध्यक्षस्थानी होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक के. पी. नाना आहेर, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. शिवाजी रेठरेकर, डॉ. प्रिया राव, कर्नल सुरेंद्र कुमार सिंग, कर्नल भारतकुमार, प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे, ऋषिकेश औताडे, जयंत धर्माधिकारी, प्रा. दिगंबर खर्डे, डॉ. सुनील निर्मळ, मनोज परजने, लीलावती सरोदे, संगिता देवकर, स्वाती लोखंडे, आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रास्तविक केले.

श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी असलेले मेंगवडे यांनी शिक्षण संपल्यानंतर विक्रम साराभाई सेंटरमध्ये काही काळ नोकरी केली. त्यानंतर स्वतः हार्डवेअर आणि स्वाप्टवेअर या क्षेत्रात आपला उद्योग सुरु केला. जागतिक दर्जाच्या उत्पादनाची निर्मिती करताना १५ वर्षांत त्यांनी २ हजार संगणक अभियंत्यांनाबरोबर घेऊन शून्यापासून सुरवात करून आठशे कोटी पर्यंत उलाढाल केली. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या प्रगतीच बद्दल बोलताना ते म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की, आपण जे बोलतोय ते सगळं अस्तित्वात येतंय तेही एका क्लिकने. संगणकाच्या सहाय्याने खेळ, अभ्यास, सिनेमे, गप्पागोष्टी, सामानाची खरेदी-विक्री अगदी काय वाट्टेल ते केलं जात आहे. अॅमेझॉनसारख्या कंपनीमार्फत आपण जिथे हवी तिथे एखादी वस्तू ज्या जागी असू तिथून ऑर्डर करू शकतो. अपेक्षित वेळेत ती आपल्याकडे हजर होते. त्यात दोष असेल तर परत घेतली जाते. प्रगतीच्या या वेगात सहभागी व्हायचं हे आताच्या पिढीचं खरं आव्हान असणार आहे. प्रा. डॉ. रामचंद्र रसाळ यांनी आभार मानले.