Breaking News

संपादकीय - तांत्रिकतेच्या युगात गुरफटत चाललेले समाजमन

जगातिल सर्वच प्रसार माध्यमांतून विकसित आणि अविकसित अशा दोन्ही प्रकारच्या देशांमधील माणसे आज मानसिकदृष्ट्या कमकुवतच नव्हे तर विकृत झाल्याचेही दिसून येते. जगातिल अनेक शाळातील शिक्षकांचे विद्यार्थ्यांबरोबरचे वर्तन अलिकडे विचार करायला लावणारे आहे. कुटुंब व्यवस्थेत असणार्‍या व्यक्तीही एकमेकांशी कटुतेने वागू लागले आहेत. यासाठी मानसिक किंवा मनोरोगतज्ञ यांचे उपचार मिळू शकतात मात्र त्याची मुबलकता त्या त्या देशातील लोकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या समस्यांमधून माणूस टोकाच्या तणावाच्या परिस्थितीत आणि दडपणाखाली येतो. 


मानवी समाज जगाच्या पाठीवर मानवतेच्या आधाराशिवाय जगात शांततेने राहू शकत नाही. जग दिवसेंदिवस आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे लहान होत चालले आहे. जगातील प्रत्येक देशाचा संपर्क एकमेकांशी वाढतो आहे. मात्र यात व्यापार उदिम वाढविण्यासाठी जसे प्रयत्न केले जातात तसे माणसा माणसांतील संबंध मानवतेवर आधारित असावेत यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच जगातील सर्वच देशांना माणासांच्या खालावलेल्या मानसिक पातळीच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. यासर्व परिस्थितीवर धर्म, प्रांत, देश, स्त्री, पुरुष या सर्व भेदांच्या पलिकडे जावून विचार करावा लागेल. 

माणसातील क्रौर्य अचानकपणे उफाळून येण्यास त्याच्यावर आजुबाजूच्या समाजाकडून होणारे अप्रत्यक्ष संस्कार हे अधिक कारणीभूत असतात. प्रत्येक मूल मोठ्या माणसांच्या हावभावांचे नक्कल करत असते. यातून असा एक संदेश मिळतो की माणूस जन्मत:च अनुकरणशिल आहे. हे अनुकरण तो त्याच्या आयुष्यात कायमच करीत असतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या वर्तणूकीत बदल व्हावयाचा असेल तर समाजाच्या सामूहिक वर्तनातही प्रखर मानवता यायला हवी. माणसाला समजून घेणे हे बर्‍याचदा कठिण असते. त्याचे मन हे त्याला घडवत असते. मनात सातत्याने असणारे विचार हे प्रकट करण्यासाठी जेव्हा माणूस कृतिशील अवस्थेत येतो तेव्हा त्या माणसाचे स्वरुप अभिव्यक्त होते. 

अभिव्यक्त होणार्‍या स्वरुपातील माणूस हा अपवाद वगळता जगभरात सारखाच असतो. सुखामध्ये त्याच्या मनाला आनंदाची अनुभूती असणे, दु:खामध्ये त्याच्या मनाला जाणवणारी अनुभूती ही तणावग्रस्त असते. मनाच्या या वेगवेगळ्या अवस्थेतून जगातील प्रत्येक व्यक्तीला जावे लागते. मात्र या मनाच्या अवस्थांना किंवा मनाला नियंत्रित करण्यासाठी जगातील सर्व धर्म मनाशी निगडीत संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मन हे कोणत्याही गोष्टीकडे सवय लागल्याशिवाय आकर्षित होत नाही. 

माणसाच्या शरिरामध्ये मन नावाचा कुठलाही अवयव भौतिकदृष्ट्या अस्तित्वात नसला तरी मन हेच माणसाच्या सर्व गुण अवगुणांचे उगम स्थान असते. त्यामुळे मनाला संस्कारीत करणे हा जगातील प्रत्येक देशापुढील आज मुख्य प्रश्‍न आहे. विज्ञान हे पूर्णत: बाह्य स्वरुपाचा विचार करत असल्यामुळे त्याच्या स्वरुपाला अंतर्यामी बनविण्यासाठी त्यातील मानस शास्त्राचा अधिक उपयोग होतो. मात्र मानस शास्त्रातील विश्‍लेषणापेक्षा मनशांतीची अनुभूती देणारी साधना ही अनेक धर्म संस्थांमध्ये उपयोगात आणली जाते. 

माणसाच्या विचारांचे आणि अभिव्यक्त होण्याचे प्रकट अप्रकट स्वरुप हे मनातूनच जन्माला येते. त्यामुळे मनाला संस्कारीत करण्यासाठी त्याला दररोज सवय किंवा एक व्यायाम आवश्यक असतो. हा व्यायाम म्हणजे एक प्रकारची साधना असते. ही साधना जवळपास सर्वच धर्म आपआपल्या पध्दतीने व्यवहारात आणत असतात. धर्मातील उपासना पध्दती ही मन आणि शरीर यांचे स्वरुप एकजीव करण्यासाठी आवश्यक ठरते. जसे ख्रिश्‍चनांचे चाळीस दिवसांचे उपवास, जैनांचे पर्युषण पर्व, हिंदूंची उपासनापध्दती, मुस्लिमांचा रोजा आणि बौध्दांचा विपष्यना आणि उपोसथ या सर्व पध्दती माणसाला खर्या अर्थाने माणूसपणाची शिकवण देणार्याच आहेत !