Breaking News

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शिरपूरच्या निवेश गुप्ताला यश

धुळे, दि. 03, डिसेंबर - भारतात सुमारे नऊ वर्षांनंतर घेण्यात आलेल्या 17 व्या आंतरराष्ट्रीय सिप अ‍ॅबॅकस स्पर्धेत शिरपूर येथील निवेश गुप्ता याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. कोइम्बतूर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत परफेक्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहा बक्षिसे पटकावली.



कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी श्रीहरी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मलेशिया येथील सिप अ‍ॅबॅकसचे संस्थापक केल्विन थम्ब, आंतरराष्ट्रीय प्रमुख दिनेश व्हिक्टर उपस्थित होते. या स्पर्धेत भारतासह सिंगापूर, मलेशिया, टांझानिया, श्रीलंका, यूएई देशातील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. खान्देश विभागातून शिरपूरच्या परफेक्ट अकॅडमीने सहा बक्षिसे मिळविली. शिवाय सर्वाधिक बक्षीस मिळवण्याची 11 वर्षांची परंपराही कायम राखली.

या स्पर्धेत निवेश गुप्ता याने अ‍ॅलम्युनी गटात पाच मिनिटांत पूर्णांक अपूर्णांक पद्धतीने आठ ते दहा ओळीचे उदाहरणे सोडविली. तीन मिनिटे 40 सेकंदात व्हिज्युबल पद्धतीने तर तीन मिनिटांत 90 गुणाकार- भागाकार सोडविला. इतर गटांमधील लेव्हल चारमध्ये हिमांशू विलास भामरे, लेव्हल सातमध्ये प्रांजल अनिल दोरिक, रोहित चंद्रकांत थोरात, लेव्हल अकरा गटामध्ये भूमिका राजकुमार चव्हाण, अलम्युनी गटात हिमांशू शरद चौधरी यांनी यश मिळविले.