Breaking News

दापोलीत गॅस एजन्सी फोडून चार लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी, दि. 22, डिसेंबर - दापोलीतील मेहेंदळे गॅस सर्व्हिसच्या कार्यालयात काल रात्री अज्ञाताने सुमारे चार लाख 11 हजार 44 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून दापोली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहेंदळे गॅस सर्व्हिसचे कर्मचारी काल (दि. 20 डिसेंबर) रात्री 8 वाजता कार्यालय बंद करून निघून गेले. आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास कर्मचारी कार्यालय उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना शटरला लावलेली दोन्ही कुलपे उचकटून काढून टाकलेली आढळली. कार्यालयात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर दापोली पोलिसांना चोरीची खबर देण्यात आली. 

त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांसमवेत कर्मचा-यांनी शटर उघडून कार्यालयात प्रवेश केला असता कार्यालयातील तिजोरीत ठेवलेली रोख एक लाख 56 हजार 390 रुपयांसह तिजोरी, काउंटरच्या ड्रॉव्हरमधील एक लाख 83 हजार 745 आणि 60 हजारांच्या एक ते दहा रुपयांच्या नोटा, 11 हजाराचे 44 गॅस रेग्युलेटर असा सुमारे चार लाख 11 हजार 474 रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्याची नोंद मेहेंदळे गॅसचे कर्मचारी केदार परांजपे यांनी दापोली पोलिसात केली आहे.