औरंगाबादमध्ये चारचाकी व दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू
औरंगाबाद, दि. 25, डिसेंंबर - औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याजवळ आज रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद जवळ हा अपघात झाला.
कृष्णा अप्पाराव बारगळ याचा मृत्यू झाला असून पवन प्रकाश जाधव जखमी झाला आहे. अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला. कृष्णा आणि पवन हे दोघे दुचाकीवर फेरफटका मारण्यासाठी सकाळी घराबाहेर गेले होते. घरी परत येत असताना नांद्राबाद येथे औरंगाबाद येथून कन्नडकडे जात असलेल्या स्कोडा चारचाकीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये कृष्णा याचा जागीच मृत्यू झाला. तर पवनला तात्काळ खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.
