Breaking News

पर्यावरणाच्या समस्यांवर संयुक्त समिती स्थापणार - रामदास कदम

नागपूर, दि. 21, डिसेंबर - जागतिक तापमानवाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज, बुधवारी विधानपरिषदेत सांगितले. हेमंत टकले यांनी नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.


यावेळी कदम म्हणाले की, हा खूप मोठा विषय असून त्यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनाबाबत बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, पर्यावरण बदलामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका अभ्यासकांकडून वर्त विण्यात येत आहे. प्रदूषणामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंची तसेच डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूवरील लसीवर दरवर्षी संशोधन करुन आंतरराष्ट्रीय बाजारातून मागवावी लागते. सध्या होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याची गरज असून कार्बन क्रेडीटचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 

घर अथवा इतर ठिकाणातून बाहेर पडताना रेफ्रिजरेटर, ए.सी. बंद करुन बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे तापमानवाढीवर नियंत्रण आणता येणे शक्य आहे.पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे- पाटील म्हणाले की, हरीतगृह वायूंमुळे वातावरणातील उष्णता रोखून ठेवली जाते. मोठ्या शहरात प्रदूषणही वाढत आहे. त्यादृष्टीने मोठ्या शहरातील घनक चरा व्यवस्थापन तसेच बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी राखून ठेवण्याची गरज आहे.