Breaking News

भूकंपामुळे सूर्या धरणाला धोका ?


पालघर, दि. 29, डिसेंबर - पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असताना विक्रमगड तालुक्यातील खुडेद अंतर्गत महालेपाडा, ठाकूरपाडा या व साखरे अंतर्गत 12 पाड्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्याची तीव्रता गेल्या तीन दिवसांपासून वाढली असून घरांना तडे गेले आहेत. हा प्रकार असाच कायम राहिल्यास याच तालुक्यात असणार्‍या मुंबई, भाईंदर, वसई-विरार यांना पाणीपुरवठा करणार्‍या सूर्या धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता गावकर्‍यांनी व्यक्त केली आहे. 
पण तालुक्यात भूकंप मापक यंत्र नसल्यामुळे त्याची तीव्रता कळू शकली नाही. गेल्या आठवड्यापासून खुडेद अंतर्गत गावपाड्यांत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मापक यंत्रणा उपलब्ध नसल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही घरांनाही तडे गेले आहेत, असे खुडेदमधील ग्रामस्थ शांताराम पांडू धूम यांनी सांगितले. सूर्या धरणालगत असणार्‍या गावपाड्यांना धक्के बसत असल्याने लोक रात्री घराबाहेर झोपत आहेत.