तहसील आणि पोलीस ठाणेपरिसरात लखलखाट
राहुरी तहसिल कार्यालय व पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात तालुक्याचे आ. शिवाजी कर्डीले यांच्या स्थानिक विकासनिधीतून गेली काही वर्षांपूर्वी हायमँक्स दिव्याचा खांब बसविण्यात आला होता. हायमँक्स दिव्यांच्या प्रखर प्रकाशात तहसिल व पोलिस ठाण्याचे आवार उजळून दिसत होते. रात्रीच्यावेळी प्रकाश व्यवस्था असल्याने या परिसरात महसूल व पोलिस प्रशासनाने कारवाईत पकडलेली वाहने दिसून होते. प्रकाशामुळे वाहनांची सुरक्षितता होत असल्याने प्रशासनही निर्धास्त असायचे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर अंधारात झाकोळून गेला होता. तसेच कारवाईत पकडलेली वाहने व वाहनांचे सुटे भाग चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनावर नामुष्कीची वेळ येत होती.
तहसील आणि पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातील वीजेच्या खांबावरील दिवे बंद अवस्थेत असल्यासंदर्भात वेळोवेळी संबंधित विभागाला सूचित करण्यात आले होते. मात्र येथील अंधाऱ्या पोलिस ठाण्याच्या आवाराकडे संबंधित विभागाने कानाडोळा करत प्रकाश व्यवस्था पुन्हा सुरु करण्यास असमर्थता दर्शविण्यात येत होती. दैनिक लोकमंथनने प्रकाशित करुन यावर प्रकाशझोत टाकताच येथील परिसर पुन्हा ऊजाळून निघाला आणि अंधारामुळे झाकोळलेले तहसिल व पोलिस ठाण्याचे आवार प्रकाशमय झाले.