‘थर्टी फर्स्ट’साठी तरुणाई आसुसली ; हॉटेल व्यावसायिकांना आनंदाच्या उकळ्या!
शहर व परिसरातील अनेक हॉटेल्स परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून करून ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी ही हॉटेल्स सज्ज झाली आहेत. यानिमित्त शहरात हजारो लिटर दारुची विक्री होत असते. देशी विदेशी दारुचा महापूर संगमनेर शहरात येत असतो. काही हॉटेल व्यावसायिकांनी आठ दिवस अगोदरच दारुचा साठा करून ठेवलेला आहे. काही हॉटेलमध्ये खास दमणहून आलेल्या बनावट दारुचाही साठा करून ठेवण्यात आला आहे. दारु उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती असतानाही या विभागाकडून संबंधित हॉटेल्सवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे संबंधित विभागाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे. ‘थर्टी फस्ट’ साजरा करण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिक आतूर झाले आहेत. मात्र असे असले तरी यामध्ये युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर असतो. गेल्या काही वर्षांपासून किशोरवयीन मुलांचे पायही हॉटेल व ढाब्याकडे वळताना दिसत आहेत. दारुचा मनसोक्त आनंद घेतांना ही मुले दिसत आहेत. दारु उत्पादन शुल्क विभाग व पोलीस खात्याने याबाबतीत कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
किशोरवयीन मुलांना दारु पिण्यासजागा उपलब्ध करून देण्याऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. संगमनेर शहर व परिसरात अनेक हॉटेल व्यावसायिकांना मद्य विक्रीचा परवाना नाही. अशा हॉटेल व ढाब्यामध्ये खुलेआम दारुची विक्री होत आहे. अनेक हॉटेल्समध्ये दमणची दारु उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा हॉटेल चालविणाऱ्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेकजण करत आहेत. किशोरवयीन मुलांना दारुच्या व्यसनापासून वाचवावे, अशी कळकळीची विनवणी पालकांमधून होत आहे. शहरातील बिअरबार व हॉटेलमच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस, होमगार्ड व दारु उत्पादन शुल्क खात्याच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून किशोरवयीन मुलांना यापासून परावृत्त करण्यात यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.