Breaking News

बहुजननामा

बहुजनांनो.... ! 
                    बहुजननामा हे केवळ सदर नव्हे तर, चर्चा मंच आहे. या नव्या चर्चा मंचावर आपले स्वागत आहे. या सदरचा मी लेखक नाही, तर चर्चेचं संचलन करणारा संचालक आहे. त्यामुळे मी एखाद्या मुद्द्यावर काही लिहिले तर त्यावर आपणही आपले विचार व्यक्त करू शकतात. प्रत्येक महिन्याचा शेवटचा रविवार आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे. या सदरमध्ये बहुजनांच्या हिताचे विचारमंथन होईल. इतिहास, साहित्य, संस्कृती् धर्म, भाषा आदि विषय बहुजनांच्या हिताशी अथवा अहिताशी निगडीत असतात. मानव समाजाची एकूणच सर्व मानवतावादी मुल्ये सर्वसमावेशक असतात. पाणी, उन, वारा, थंडी हे नैसर्गिक नियमानुसार वागतात. त्यांना प्रादेशिक सीमांचे बंधन नसते. एखादी नदी अनेक देशातून वहात जाते, मात्र ती भेदभाव न करता सर्व जमिनीला सुपिक करीत जाते व सर्वांना पाणी देत जाते. 24 तासात सुर्य जगातील सर्वच देशांवर आपल्या जीवनदायी किरणांची उधळन करीत जातो. नैसर्गिक मुल्ये ही निखळ असतात. तशी मानवी मुल्ये निरपेक्ष असतात काय? ती तशी निखळ असतील तर काही प्रश्‍न उद्भवणार नाहीत. मात्र ती तशी नसतील तर अनेक प्रश्‍न उद्भवतात. प्रत्येक युगात हे प्रश्‍न विचारणारेही आहेत आणी त्याची उत्तरे देणारेही आहेत. योग्य प्रश्‍नांना अचूक उत्तर मिळेलच याची खात्री नसते. मात्र प्रश्‍नच चूकीचा असेल उत्तर हमखास चूकीचेच मिळणार, हे ठरलेले आहे!



आपल्या देशाला 5 हजार वर्षांची परंपरा आहे, असे आपण म्हणतो. चेतन-अचेतन सृष्टीमय जगत संघर्षाने भरलेले आहे. अणू, रेणूंच्या संघर्षातून नवे परमाणू जन्म घेतात व त्यातून नव्या पदार्थांचे दर्शन होत असते. चेतन सृष्टिलाही हाच नियम लागू आहे. वाद-विवादातून संवाद घडतो. हाच संवाद पुन्हा वाद होतो, त्यातून विवाद उत्पन्न होऊन पुन्हा संवादाकडे वाटचाल सुरू होते. प्रत्येक काळात प्रत्येक युगात प्रश्‍न उभे राहतात. त्यांच्या उत्तरात संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष आपल्याला एका नव्या व्यवस्थेकडे घेऊन जातो. ही नवी व्यवस्था सापेक्षपणे पुरोगामी व सुसह्य असते. आपण पुढच्या युगात प्रवेश करतो न करतो, तोच पुन्हा नवे प्रश्‍न विचारणारे उभे राहतात. ही साखळी सातत्याने चालूच असते. प्राथमिक साम्यवादी(?) समाजाच्या शवावर शत्रूभावी विषम समाज निर्माण झाला व तेथून दोन शत्रूभावी वर्गांमध्ये संघर्ष होऊन नव्या सापेक्ष समतेकडे जाणारा समाज निर्माण होत गेला. मार्क्सच्या या ऐतिहासिक भौतिकवादी विश्‍लेषणाप्रमाणे जगाचा अभ्यास झाला व त्यातून संघर्षाला दिशा दिली गेली. नव्या अर्थशास्त्राची मांडणी झाली. याचा इतका जबरदस्त परिणाम झाला की, जगभर अनेक देशांमध्ये मार्क्सवादी क्रांत्या झाल्या व बर्यानच देशांमधील प्रस्थापित वर्गांनी स्वतःच काही बदल घडवून आणीत पुरोगामी कार्यक्रम राबविले. ज्यांनी मार्क्सवादी क्रात्यांकडे दुर्लक्ष्य केले ते आर्थिक अरिष्टात सापडलेत व परिणामी संपूर्ण जगालाच आर्थिक मंदीत ढकलले. 

भारतातही अशी सुधारणावादाची परंपरा आहे. अगदी अलिकडचे उदाहरण सांगायचे म्हणजे बँकाचं राष्ट्रीयकरण, जमिन सिलिग कायदा वगैरे. परंतू भारतात अशा आर्थिक सुधारणांचा येथील शोषित-पिडितांना फारसा फायदा झाला नाही. थोड्या काळासाठी भुलभूलय्या निर्माण झाला एव्हढेच! विषम समाजव्यवस्थेतील दोन शत्रूभावी घटकांमधील संघर्ष-प्रवाहाला आपल्या सोयीची वाट करून देणे अथवा तो दाबून ठेवणे यापैकी काहीही झाले तरी प्रतिक्रांतीला सामोरे जाणे चूकत नाही. भारतात मात्र अशा घटनांकडे पाहतांना एका वेगळ्या दृष्टिने पाहावे लागते. ती दृष्टि कोणती, समाजव्यवस्था कोणती, उभे राहिलेले प्रश्‍न कोणते व त्याच्या उत्तरात केले गेलेले संघर्ष कोणते, या संघर्षात नायक कोण व खलनायक कोण वगैरेंची चर्चा आपण या बहुजन नामाच्या मंचावर या पुढे करीत राहूच! आपल्या प्रतिसादाची अपेक्षा! व्हाट्साप-फेसबुकच्या जमान्यात आपण एका क्षणात एका क्लिकवर प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो. पण या सोशल मिडियाला अजून संदर्भांचा दर्जा मिळालेला नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. भारतात या मिडियाला विश्‍वासार्हता मिळणे दुरापास्तच! म्हणून प्रिंट मिडियाला अजूनही पर्याय नाही. म्हणून आम्ही सुरू केलेला आहे 'बहुजननामा'!
प्रा. श्रावण देवरे