Breaking News

सारंगखेडाचे अश्व संग्रहालय जगातील पर्यटकांचे आकर्षण ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार : तब्बल ३०० वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथील यात्रोत्सव आणि अश्व बाजार पर्यटकांचे आगामी काळात आकर्षण ठरणार आहे. तसेच अश्व संग्रहालय देशविदेशातील अश्वप्रेमी व पर्यटकांचे आकर्षण ठरेल. नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सारंगखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे यात्रोत्सवानिमित्त आयोजित चेतक फेस्टिव्हलला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटन, रोजगार हमी योजना व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हीना गावित, आमदार डॉ.विजयकुमार गावित, चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल, सरपंच भारतीताई कोळी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे,सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, विक्रांत रावल, रेखा चौधरी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सारंगखेडा येथील चेतक महोत्सवासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी यांनी परिश्रम घेत कमी कालावधीत आयोजित केलेला फेस्टिव्हल कौतुकास्पद आहे. जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या यशार्थच्या माध्यमातून या महोत्सवाचे संदर्भ थेट महाभारत काळात असल्याचे समजले.

घोड्यांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे. चेतक फेस्टिवल आगामी काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल. येथे होणाऱ्या अश्व संग्रहालयानिमित्त प्राचीन काळापासून आजपर्यंतचा घोड्यांचा इतिहास, घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्यांचे ब्रीडिंग यासह घोड्यांबद्दलच्या विविध गोष्टी येथे येणाऱ्या पर्यटकांना अश्व संग्रहालयाच्या माध्यमातून समजतील. त्यामुळे येथे घोडा विकास व संशोधन केंद्र, पशुचिकित्सालय कार्यान्वित करण्याबाबत विचार केला जाईल.

पर्यटन हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून सामान्यातील सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्यामुळे चेतक महोत्सव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. पर्यटन मंत्री श्री.रावल यांनी पर्यटन विभागाचा कायापालट केला आहे. त्यांना पर्यटनाचे चांगले व्हिजन आहे. त्यांचे काम अभिनंदनीय आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

तापी नदी काठावरील प्रकाशेच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यासह तोरणमाळच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच शनिमांडळ, रावलापाणी या स्थळांचा विकास होऊन पर्यटन व्यवसायाची वृद्धी होईल यासाठी प्रयत्न केले जातील. तापी नदीवरील बॅरेजमुळे सारंगखेडा येथे जलसाठा निर्माण झाला आहे. येथे साहसी जलक्रीडा प्रकार सुरू केले जातील. त्यामुळे या भागात पर्यटनाचे वर्तुळ तयार होईल.

जगातील पर्यटकांना आदिवासी संस्कृतीचे मोठे आकर्षण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील होळी महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. त्यामुळे या कालावधीत देशविदेशातील पर्यटक येण्यासाठी ब्रॅडिंग करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. तसेच तापी नदीवरील उपसा सिंचन योजनांबाबत 15 दिवसांत बैठकीचे आयोजन करुन शेतीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, सारंगखेडा येथील यात्रोत्सव म्हणजे बहुआयामी यात्रोत्सव आहे. यात्रेच्या माध्यमातून येथील परंपरा, संस्कृती सर्वोच्च पदाला नेण्याचे प्रयत्न असून जगासमोर येण्यास मदत होईल. सारंगखेडा बॅरेज येथे वॉटर स्पोर्ट विकसित करण्यात येईल. याशिवाय प्रकाशे, रावलापाणी, तोरणमाळ, नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा विकसित करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे, अभयारण्य याविषयी जनजागृतीची मोहीम राबविण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात सर्वाधिक पर्यटक येतील, असा विश्वास पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.