Breaking News

ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका !

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, डिसेंबर - राजापूर येथे होत असलेल्या ग्रीन रिफायनरीमुळे या भागातील पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचणार नाही. मात्र, नागरिकांनी पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याचे सांगितल्याने रिफायनरी भागात राज्य सरकारने युरोसीक्स पर्यावरणाचे मॉडेल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शून्य प्रदूषण राहणार आहे. प्रकल्पासाठी वापरण्यात येणार्‍या पाण्यावर त्या ठिकाणीच प्रक्रिया करण्यात येणार आहे. 


आंबा, काजूवर या प्रकल्पामुळे कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, याबाबतही प्रक ल्पग्रस्तांनी प्रश्‍न उपस्थित केल्याने आंब्यावरील रिसर्च सेंटर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, असे असतांना जनतेची माथी भडकवून शिवसेना दुटप्पी भूमिका बजावत असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.
कणकवली येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, या प्रकल्पाबाबत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक मुद्दे मान्य करण्यात आले. हा प्रकल्प म्हणजे कोकणचे भवितव्यच बदलून टाकणारा आहे. बेरोजगारीची समस्या संपणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहेत. हा प्रकल्प झाला तर राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक कोकणात होणार आहे. मात्र, मुंबई, पुणे येथील काही एनजीओ या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रक ल्पग्रस्तांमध्ये गैरसमज पसरवत आहेत.