Breaking News

एचआयव्ही संसर्ग मुक्त अभियानात कार्यरत असल्याचा अभिमान - डॉ. रेखा डावर

मुंबई, दि. 03, डिसेंबर - एचआयव्हीग्रस्त मातांपासून होणा-या अर्भकांना एचआयव्ही होऊ न देणे, म्हणजेच एचआयव्हीमुक्त नवीन पिढी जन्माला आणण्याचे कार्य करत असल्याचा मला अभिमान वाटतो. केंद्र शासन आणि राज्य शासन तसेच माझे सहकारी यांच्या सहकार्याने हे कार्य करण्यास यश मिळाले आहे अशा भावना वरिष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉ रेखा डावर यांनी आज व्यक्त केल्या.


एचआयव्हीग्रस्त मातांपासून बालकांना होणा-या एचआयव्हीच्या कार्याची दखल घेत काल राज्य शासनाच्यावतीने आरोग्य मंत्री डॉ दिपक सावंत यांनी विशेष पुरस्कार देऊन डॉ. डावर यांचा सन्मान केला. मंत्रालयात जागतिक एड्स दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करून डॉ. डावर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, आरोग्य सेवेचे संचालक डॉ. सतिश पवार, युएसआयडीच्या एचआयव्ही डिव्हीजनच्या भारतातील प्रमुख सेरा हैदारे आदी उपस्थित होते.

डॉ. डावर यांनी गेली 40 वर्षे महाराष्ट्रात स्त्री आरोग्य व वैद्यकीय शिक्षणात भरीव कामगिरी केली आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊनही सामाजिक कार्याची जाण असलेल्या डॉ. डावर या भारतातील जनतेच्या सेवेसाठी परतल्या. राज्यात औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी सेवा दिली आहे. कुटूंब नियोजन या शासनाच्या कार्यक्रमातही त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. जे.जे. रूग्णालयात त्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या.