मदन पाटील लोकाभिमुख नेते होते - अशोक चव्हाण
सांगली, दि. 03, डिसेंबर - पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील व सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील यांच्याकडून राजकीय बाळकडू घेतलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील लोकाभिमुख नेते होते. त्यांच्यासारखा धाडसी, मनाचा मोठेपणा असणारा व कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभा राहणारा नेता होणे नाही. त्यामुळे मदन पाटील यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या पाठिशी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी ठामपणे रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केले.
सांगली महापालिकेच्यावतीने सांगली- माधवनगर रस्त्यावर मदन पाटील यांच्या स्मारकस्थळी उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण अशोक चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या सर्वांनीच मदन पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम यांची तुफान राजकीय फटकेबाजी व्यासपीठावर उपस्थित सर्वच नेत्यांची फिरकी घेणारी ठरली.