Breaking News

बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


पाथर्डी/प्रतिनिधी/-तालुक्यातील माणिकदौंडी गावातील बोरसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोनळवाडी येथील शेतकरी भीमा आबा सोनाळे(वय-६५)यांनी बँकेच्या कर्जाला व वाया गेलेल्या कापसाच्या पिकाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला
तालुक्यातील माणिकदौंडी भागातील बोरसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सोनाळेवाडी हे गाव येते.येथील शेतकरी भीमा आबा सोनाळे(वय-६५)यांचे डोक्यावर सेवा सहकारी सोसायटी व पंजाब नॅशनल बँक या राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज होते.त्यात शेतात पिकवलेल्या कापसाच्या पिकावर बोण्डअळी या पडलेल्या रोगामुळे बरेचशे पीक वाया गेले होते.त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता.

त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे या विवंचनेतून ते निराश झाले होते.याला कंटाळून त्यांनी शुक्रवारी रात्री विषारी औषध घेतले होते.यावेळी नातेवाईकांनी त्यांना लगेचच नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते.मात्र,उपचार चालू असतांनाच त्यांचे निधन झाले.१८ डिसेंबर सोमवार दुपारी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.मागील महिन्यात देखील माणिकदौंडी भागातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.