Breaking News

स्वतःच्या कामाशी व कार्याशी प्रामाणिक राहून सामाजिक जाणीवेतून योग्य कर भरणाऱ्यांना आयकरचे भय राहणार नाही.


आयकर अधिकारी, कर सल्लागार व करदाते यांच्यात सुसंवाद वाढवून योग्य तो आयकर भरला तर त्याचा देशाच्या विकासासाठी व पर्यायाने अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी उपयोग होईल. पैसा समाजातून बनतो त्यावर समाजाचा हक्क आहेच हे ओळखून स्वतःच्या कामाशी व कार्याशी प्रामाणिक राहून सामाजिक जाणीवेतून योग्य कर भरणाऱ्यांना आयकरचे भय राहणार नाही आसे मत प्रधान मुख्य आयकर आयुक्त श्री.ए.सी. शुक्ला यांनी व्यक्त केले.
नगर सीए शाखा,मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व आमीच्या वतीने माउली सभागृहात आयोजित आयकर विषयी जागृती व संवाद कार्यक्रमात पुणे विभागीय प्रधान मुख्य आयकर आयुक्त श्री.ए.सी.शुक्ला यांनी नगरकरांशी संवाद साधला. यावेळी प्रधान आयुक्त सत्यकाम मिश्रा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री.अरविंद पारगावकर व प्रकाश गांधी,आमीचे अशोक सोनवणे व राजेंद्र कटारिया, नगर सीए शाखा अध्यक्ष सीए प्रसाद भंडारी,उपाध्यक्ष सीए ज्ञानेश कुलकर्णी, सचिव परेश बोरा,खजिनदार सीए किरण भंडारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शुक्ला म्हणाले कि नोटबंदी, जीएसटी, नेट बँकिंगचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल. केंद्र शासनाने देशाच्या हिताचे घेतलेले धाडसी निर्णय भविष्याचा वेध घेणारे असून अघोषित कालाधन अथवा उत्पन्न लपविणे आता अवघड होणार आहे. तसेच येत्या काळात आयकर आकारणीत बदल होणार असून नागरिकांनी याविषयी स्वतःचे विचार लेखी स्वरुपात आयकर विभागात दिले तर त्याचाही विचार नक्कीच केला जाईल असा विश्वास हि शुक्ला यांनी दिला.

आधुनिक साधनांमुळे प्रत्येकाचा खर्च, उत्पन्नाचा आलेख जलद गतीने उपलब्ध होत असून केवळ अज्ञान व चुकीच्या समजुतीतून योग्य आयकर न भरल्यास दंडात्मक कारवाईत कोणी अडकू नये यासाठी संवाद मोहीम राबविण्यात येत आहे.श्री.शुक्ला यांनी आयकराबरोबरच आध्यात्मिक मार्गदर्शन करून उपस्थितांना ध्यानाचे महत्व सांगून ध्यानधारणा करून घेतली. स्वतःचे मन व शरीर स्वस्थ असेल तर प्रत्येक कार्य व हेतू उत्तमरीत्या पार पडते असा विचार त्यांनी प्रगट केला.

प्रधान आयुक्त सत्यकाम मिश्रा म्हणाले कि, आयकर अधिकारी व कर सल्लागार (सीए) एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्यापासून काही गोष्टी आता लपणार नाहीत व त्यांना लपविता येणार नाहीत हे ओळखून योग्य कर भरून निवांत व्हा. देशात करदात्यांचे प्रमाण वाढले तरच देश महासत्ता होईल त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री.अरविंद पारगावकर व आर्मीचे अशोक सोनावणे यांनी यावेळी मनोगतात सांगितले कि, सर्वसामान्यांना आयकर विषयीचे भय दूर होऊन सरळ व सोपी कर प्रक्रिया झाली तर आयकर दात्यांचे प्रमाण वाढेल.

प्रास्ताविक व स्वागत नगर सीए शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद भंडारी यांनी केले देशातील बदलती परिस्थिती व फक्त ३% आयकर दाते हे आजचे वास्तव असून आधीक लोकांनी योग्य आयकर भरावा, आयकर दाते वाढावेत व नागरी सुविधा उत्तम मिळण्यासाठी व आयकर विषयी जागृतीसाठी हा संवाद कार्यक्रम सामाजिक जाणीवेतून सीए शाखेने आयोजित केल्याचे सांगितले.

प्रमुख अतिथीचा परिचय सीए सनीत मुथा यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सीए ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले तर आभार खजिनदार सीए किरण भंडारी यांनी मानले. कार्यक्रमास मर्चंट बेन्केचे अध्यक्ष संजय गांधी, नगर आयकर विभागाचे जॉईन्ट कमिशनर अभिषेक मिश्राम , जॉईन्ट कमिशनर सम्राट राही, नगर आयकर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी ,इमा असो.चे पदाधिकारी, इंजिनियर व आर्कीटेक्ट असो.चे पदाधिकारी, सीए सुशील जैन ,सीए मोहन बरमेचा, सीए अजय मुथा,सीए विध्यार्थी,व्यापारी,उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.