Breaking News

उसाच्या वजनात काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई - सहकारमंत्री सुभाष देशमुख


शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना राज्यातील काही साखर कारखान्यांकडून वजन काट्यात बनवाबनवी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात कारखान्यांच्या वजन काट्याच्या ठिकाणी भरारी पथकाकडून छापे मारून तेथे गैरव्यवहार आढळल्यास कारखान्याच्या संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार हर्षवर्धन जाधव, विजय वडेट्टीवार, नसीम खान आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरु असताना एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना काही साखर कारखान्यांकडून त्याच्या वजनात फेरफार केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा लक्षात घेऊन अशा प्रकरणी भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल. 

सर्व साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक आणि तोडणीचा एकच दर निश्चित करावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून त्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. साखरेवर आयात शुल्क वाढविण्यासह साखर उद्योगाच्या विविध मागण्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.