Breaking News

प्रमुख राज्य मार्गावरील ९७ टक्के खड्डे भरले; उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू - चंद्रकांत पाटील


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजविणात येणार असल्याचे सांगितले होते. यासाठी मंत्रालयात वॉररुमही सुरू केली होती. या मोहिमेला यश आले असून प्रमुख राज्य मार्ग व राज्य मार्गावरील 97.25 टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गावरील 82.84 टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित कामे वेगाने सुरू असून लवकर सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. काही मार्गावर जर खड्डे आढळले तर नागरिकांनी कळवावे, ते खड्डे तातडीने बुजविण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना श्री. पाटील यांनी खड्डेमुक्त रस्ते अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील रस्त्यांची कामे ही वाहतुकीचा अंदाज न घेता, क्षमता न पाहता करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात राज्य मार्गावरील रस्त्यांवर खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकूण 89 हजार 190 किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये 6 हजार 163 किमीचे प्रमुख राज्य मार्ग, 30 हजार 970 किमीचे राज्य मार्ग आणि 52 हजार 057 किमीचे लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. आज 15 डिसेंबर 2017 च्या दुपारपर्यंत यातील प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे पडलेल्या 23 हजार 381 किमी लांबीच्या रस्त्यांपैकी 22 हजार 736 किमी (97.25 टक्के) लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर उर्वरित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. राज्यातील 17 जिल्ह्यातील खड्डे शंभर टक्के बुजविण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी टिकाऊ डांबरीकरण आणि रोड कोटिंग करण्यात आले. काही तुरळक ठिकाणी तांत्रिक अडचणी, अवकाळी पाऊस अशा कारणांस्तव खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण झाली नसली तरीही कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहेत.

प्रमुख जिल्हा मार्गाचे रस्ते हे जिल्हा परिषदांकडून बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले आहेत. यातील 52 हजार 54 किमी लांबीच्या रस्त्यांपैकी 32 हजार 588 किमी लांबीच्या रस्त्यांवर खड्डे पडले होते. यातील 26 हजार 994 किमी लांबीच्या (82.84 टक्के) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदांकडून वर्ग झालेले रस्ते हे रोहयोअंतर्गत तयार केलेले असल्यामुळे तसेच त्यांची अवस्था खूपच खराब असल्यामुळे या रस्त्यांची कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.