Breaking News

दखल - खडसे, गोटेंचा भाजपला घरचा अहेर!


माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. ज्यांनी 40 वर्षे भाजप वाढविण्यासाठी कष्ट केले, त्यांना आता प्रस्थापित म्हणून डावलले जात आहे आणि त्यागी नारायण राणे यांना मात्र मंत्रिपदाचे दरवाजे किलकिले केले जात आहेत. भोसरी येथील एमआयडीसीची जमीन खरेदी केल्यावरून खडसे यांना मंत्रिपद गमवावं लागलं. त्यांच्यापेक्षा जास्त गंभीर आरोप असलेल्या प्रकाश मेहता, पंकजा मुंडे-पालवे, विनोद तावडे यांच्यासारख्यांना मात्र अभय दिलं जात आहे. चंद्रकांतदादा पाटलांवर एवढे आरोप होऊनही त्यांना पाठीशी घातलं जात आहे. त्यामुळं तर मध्यंतरी खडसे यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. आपली अवस्था लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली असल्याची सल त्यांनी व्यक्त केली होती.
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडसे यांनीच त्यातील त्रुटी दाखवून सरकारची पिसं काढली होती. त्यानंतर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर काढलेल्या मोर्चाच्यावेळी खडसे यांनी विरोधकांना त्यांच्या फॉर्महाऊसवर बोलवून त्यांचा पाहुणचार केला होता. आताही खडसे यांनीच सरकारला वारंवार धारेवर धरलं आहे. एका प्रश्‍नावरून तर त्यांनी पंकजा मुंडे यांचीच कोेंडी केली. विरोधकांच्या मदतीला खडसे, तर खडसे यांच्या मदतीला विरोधक असे चित्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात वांरवार दिसायला लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि चंद्रकांतदादांनी खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेशाबाबत वारंवार सूतोवाच केलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र खडसे यांना चार हात दूरच ठेवत आहेत. त्यांच्या चौकशीचा अहवाल सादर होऊनही तो विधिमंडळापुढे ठेवला जात नाही. जाणीवपूर्वक विलंब लावला जात आहे. त्यामुळं खडसे त्यांची खदखद वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करतात. आता तर अशा नाराजांची संख्या वाढत चालली आहे. 


गुजरातच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल, असं वाटलं होते; पण तशी काही चिन्हं दिसत नाहीत. आमची मंडळी अजून हवेतच आहेत, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी राज्याच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे. नागपूरमध्ये असूनही ते संघाच्या बौद्धिक शिबिराला गेले नाही, म्हणून त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यात आमदार देशमुख यांचाही समावेश आहे. आमदार देशमुख यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाअगोदर पत्र पाठवून थेट जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चाही चालू झाली आहे, तर खडसे यांना विरोधकांचं थेट आमंत्रण आहे. खडसे यांनीही अन्य पक्षांत प्रवेश करण्यासाठी आपल्याला निमंत्रण असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. कार्यकर्त्यांच्या मनात आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्यामुळं नाराजी आहे. 

कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याची कबुली खडसे यांनी दिली असली, तरी त्यांनी सध्या तरी पक्षांतर करणार नसल्याचं जाहीर केलं आहे; परंतु गुजरातच्या निवडणुकीनंतर राज्यात पक्षासाठी वातावरण चांगलं नाही; पण पक्षाला अजूनही लक्षात येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपला पाय दु:खत होता. उपचार चालू होते. दवाखान्यात होतो. तशी कल्पना दिली होती, तरीही संघाच्या बौद्धिक शिबिराला अनुपस्थित राहिल्याबद्दल नोटीस काढल्याचा राग त्यांच्या मनात डोकावत होता. राज्यात पक्षासाठी फार काही वातावरण चांगलं नाही, असं त्यांनी थेट जाहीर करून सांगितली. अन्य पक्षांत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ऑफर फार पूर्वीपासून आहेत; पण मला पक्ष सोडून जायचं नाही. पक्षच सोडायचा असता तर कधीच सोडला असता. 20 महिने (मंत्रिपद गेल्यानंतर) कशाला वाट पाहत बसलो असतो, अशी विचारणा ते करतात. मंत्री होण्यासाठी पक्ष वाढविला नाही. लोकांच्या कामासाठी बोलत राहणं माझा स्वभाव आहे आणि मी बोलत राहीन, असं सांगून त्यांनी राज्य सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिले. 

गुजरातच्या विधानसभा निकालावरून भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपला घरचा अहेर दिला आहे. आमदार गोटे यांनी गुजरात निकालावरून धडा घ्या, अशा आशयाचं एक खुलं पत्रच भाजपच्या तमाम पक्ष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना लिहिलं आहे. गोटेंच्या या लेटरबॉम्ब नंतर भाजपमधील नाराजांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं दिसतं आहे. याआधीही भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. खासदार नाना पटोले यांनी तर पक्ष सोडून आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यानंतर आशिष देशमुख यांनीही विदर्भाच्या मुद्यावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. आता आमदार अनिल गोटे यांनीही घरचा अहेर दिला आहे. एकनाथ खडसे तर नागरपूरच्या अधिवेशनात रोजच सरकारविरोधात उघडपणे बोलत असतात. सामान्य माणसाला गृहीत धरता येत नाही, हेच गुजरात निकालानं दाखवून दिलं आहे. 

नव्यानं पक्षात येणार्‍यांच्या आरत्या ओवाळायच्या आणि पक्ष कार्यकर्त्यांना घरच्या गाईचे गोर्‍हे अशी वागणूक द्यायची. अशा वर्तणुकीचा हा फटका आहे. आपल्याला मिळालेली सत्ता कायम आहे अशा गैरसमजात लाटेवर स्वार झालेल्यांच्या डोळ्यात या निकालानं अंजन घातलं आहे. वर्षभरात आपल्या पालिकेच्या निवडणुका आहेत. पालिकेतील सत्ताधार्‍यांनी काय केलं, असं विचारण्यापेक्षा राज्यात आपली सत्ता असताना आपण काय केलं, हे जनतेसमोर ठसठशीत मांडता आलं पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, वरुण गांधी, लालकृष्ण अडवाणी या ज्येष्ठ नेत्यांनी यापूर्वीच मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढलेले आहेत. नाना पटोले यांनी तर थेट राजीनामाच दिला आहे. राज्यातही सारं काही आलबेल नाही, हे खडसे, गोटे, देशमुख यांच्यासारख्यांच्या वक्तव्यावरून ध्वनित होत आहे.