Breaking News

ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे !

जामखेड/ ता प्रतिनिधी - मागील सहा महिन्यांपासून जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील शाळेमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याबाबत शिक्षणाधिकारयांकडे अनेक वेळा तक्रार अर्ज केले तरी शिक्षक न मिळाल्याने दि. 21 डिसेंबर रोजी ग्रमस्थानी शाळेला कुलूपच ठोकले. दिघोळ येथे 1 ली ते 4थी पर्यंत शाळा असून 115 इतकी पटसंख्या आहे. 


याठिकाणी चार शिक्षकी शाळा आहे. एक शिक्षक सहा महिन्यांपूर्वी जिल्हा बदली मध्ये बदलून गेल्याने त्यांच्या जागी आद्याप शिक्षक मिळाला नसल्याचे करण सांगूण या ठिकाणी शिक्षकच आले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षक द्या अन्यथा आम्ही ग्रामस्थ दि. 21रोजी शाळेला कुलूप ठोकू असे निवेदन दिले होते. याबाबत जिल्हा परिषद सदस्य वंदना लोखंडे यांनीही सदर शाळेला शिक्षक मिळावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 

तरीदेखील सहा महिने शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तय्यब शेख, उपाध्यक्ष शिवाजी गिते, ग्रा. प. सदस्य रामभाऊ रसाळ, माजी पं. स. सदस्य मनोज राजगुरू, आशोक गिते, बाबासाहेब राजगुरू, बाळासाहेब दगडे, भिमराव तागड, भारत शिंदे, सुरेश गिते, चेअरमन मच्छिंद्र गिते, खंडेश्‍वर पोतदार, भारत शिंदे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्या तालुक्यात पुरेशे शिक्षक नाहीत. उपध्यापक 28, मुख्याध्यापक 8, पदवीधर शिक्षक 3, केंद्रप्रमुख 5, विस्तार अधिकारी 1 अशी पदे आजमितीस रिक्त आहेत. अनेक ठिकाणी दोन शिक्षकी शाळांमध्ये एक शिक्षक काम करत आहेत. अनेक ठिकाणी अधिकृत शिक्षक नसल्याने तात्पुरते प्रतिशिक्षक नेमले आहेत. एकीकडे कमी पटामुळे शाळाबंद करण्याचे तर पट असुनही पुरेशे शिक्षक न देण्याचे शासनाचे धोरण चुकीचे असुन, याकडे आज गावकर्‍यांनी टाळे ठोकून सर्वांचे लक्ष वेधले आहे.