Breaking News

वडापावच्या गाडीतच झाला गॅस सिलिंडरचा स्फोट

पुणे, दि. 02, नोव्हेंबर - वडा पावची गाडी म्हणून वापरात आणलेल्या छोटा हत्तीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. गाडीत आधी शॉर्ट सर्किट झाला. नंतर गॅस सिलिंडरचा ब्लास्ट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. स्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे. सागर बाफना (वय-27, रा.बेडचाळ रुईपाटी एमआयडीसी बारामती) असे वाहन मालकाचे नाव आहे.


सूत्रांनुसार, ही घटना सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. छोटा हत्ती (एम.एच.12 के.पी. 3825) या वाहनात वडापाव तळण्यासाठी लागणारा मोठा गॅस सिलिंडर ठेवून लासुर्णे येथील आठवडे बाजारासाठी बाफना हे बारामतीवरून निघाले होते. छत्रपती कारखान्यासमोरून जात असताना रस्त्यावरून जाणा-या नागरिकांनी गाडीतून धूर निघत असल्याचे सांगितले. 

त्यावरून लगेच गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. गाडीच्या खालच्या बाजूने आग लागून धूर निघत होता. तसेच आग वाढू लागल्याने गाडीतील गॅस सिलिंडरने भडाका घेतला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.