Breaking News

नगर तालुक्यातील कापसावरील बोंडअळीचे पंचनामे सुरु ‘लोकमंथन’च्या वृत्ताची दखल


अहमदनगर ता. प्रतिनिधी - तालुक्यातील गुलाबी बोंड अळीमुळे मोठे नुकसान झालेल्या कापसाचे पंचनामे सुरु झाले असल्याची माहिती भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी दिली. ‘कापसाच्या उभ्या पिकात नांगरणी अन् शेतकर्यांचे डोळे पाणावले’ या मथळ्याखाली ‘दैनिक लोकमंथन’ने याच आठवड्यात वृत्त प्रकाशित करुन शेतकर्यांच्या अन्यायाला वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल घेत कृषि अधिकार्यांनी नगर तालुक्यात कापसावरील बोंडअळीचे पंचनामे सुरु केले आहेत. दरम्यान, पंचनाम्याची ही किचकट प्रक्रिया बदलण्यात यावी, अशी मागणी नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी केली.
जिल्हामध्ये कापसाचे १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी सुमारे १ हजार ९२५ क्विंटल बियाणांची लागवड करण्यात आली. यापैकी जवळपास सर्वच पिकाला गुलाबी बोंडअळीने उद़ध्वस्त केल्याचे दिसून आले. प्रत्येक गावात सुरू झालेल्या पंचनाम्यासाठी प्रथम (जी) फॉर्म भरुन द्यावा लागतो. या फॉर्म मध्ये नाव, पत्ता, विक्रत्याचे नाव, कंपनीचे नाव, वाणाचे नाव, लागवडीचे क्षेत्र, पेरणीचा दिनांक आदी बाबींची माहीती देऊन कापसाचे लेबल, वापरलेला रिकामा डबा किंवा पिशवी आणि यासोबत बिल जोडण्याची सूचना करण्यात आलेली आहे. (जी) फॉर्मनंतर (एच) फॉर्ममध्ये सुमारे ४० मुद्यांची माहीती भरुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नाव, गाव, पत्ता, बियाणाचा वाण, विक्रेता व कंपनीचे नाव, पत्ता, यासह पेरणी दिनांक, पेरलेले क्षेत्र, प्रत्येक टेकडीवर पेरलेल्या बियाण्यांची संख्या, किती खोलीवर पेरलेले अंतर, लगतच्या शेतातील अंकुरणाची टक्के वारी, पर्जन्यमान अपेक्षित उत्पन्न, जमिनीचा प्रकार आणी पोत आदी अवास्तव मुद्दे विचारण्यात आलेले आहेत. 

यानंतर आणखी एक (आय) फॉर्म येणार असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती विचारली जाणार आहे. मुळातच प्रत्येक शेतकऱ्यांना तिन्ही फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. नेमका किती परतावा मिळेल तसेच नुकसान भरपाई मिळेलच याविषयी शेतकऱ्यांमध्ये खात्री नाही. दरम्यान, अनेक शेतकर्यांनी खरेदी केलेले कापसाचे बील ऐनवेळी मिळत नसल्याने अनेकांची धावपळ उडाली आहे. तर काही शेतकरी बी खरेदी केलेल्या दुकानदाराकडे पुन्हा बिलाची केविलवाणी मागणी करताना दिसून येत आहेत. मात्र बी खरेदी करुन दोन ते तीन महिने उलटले असल्याने दुकानदार खरेदी केलेले बील किंवा त्याची पोहच दाखवा तरच बीले देतो, पवित्रा घेत आहेत. त्यामुळे ज्या शेतकर्यांची बीले हरवली आहेत, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कापसाची लागवड आहे, त्याला रोगाने ग्रासले आहे. परंतु बिलाअभावी फाँर्म न भरता आल्याने अनेक शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.