Breaking News

शिंगणापूर-राहुरी रस्त्यासाठी ११२ कोटींची निविदा! दोन वर्षांत केले जाणार रस्त्याचे काम


 सोनई - जागतिक किर्तीच्या दोन देवस्थांना जोडणाऱ्या रस्त्याची कित्येक दिवसाची मागणी होती. ती आता पूर्ण होताना दिसत आहे. कायम वाहतूक कोंडी होत असलेल्या शिंगणापूर-राहुरी या सततच्या वर्दळीच्या रस्त्याची दैन्यावस्था आता संपत आली आहे. शासनाच्या बांधकाम विभागाने या २६ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी १११ कोटी ७९ लाखांची निविदा प्रसिद्ध केली आहे. हा महामार्ग विकासाचा महामार्ग ठरणार असून दोन वर्षांत या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. 
राहुरी आणि नेवासा या दोन तालुक्यांत व्यापार, उद्योग व्यवसायांत वाढ होऊन जागतिक कीर्तीचे दोन देवस्थाने या रस्त्याने जोडले जातील. त्यामुळे शिर्डीहून शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. देशातील भाविक मोठ्या संख्येने साई व शनिदर्शनासाठी येत असतात. मात्र रस्त्याच्या समस्येने भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राहुरी ते शनिशिंगणापूर हा रस्ता चौपदरी करण्याची कित्येक दिवसांपासूनची मागणी आता पूर्णत्वास जात आहे. साई आणि शनीदर्शनासाठी येणाऱ्या केंद्रीयमंत्री आणि राज्यातील मंत्र्यांकडे या भागातील लोकप्रतिनिधी सातत्याने लावून धरली होती. 

आता खऱ्या अर्थाने या अडचणीच्या रस्त्याला मुहूर्त मिळाला आहे. एका वृत्तपत्रात व सोशल मीडियावरही ही निविदा नोटिस प्रसिद्ध झाल्याने राहुरी व नेवासा या दोन्ही तालुक्यात व भाविकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळातच राहुरीपासून हा रस्ता एकपदरी अरुंद होता. या रस्त्याच्या बाजूने वाढत असलेली अतिक्रमणे आणि सर्व प्रकारच्या वाढलेली मोठी गर्दी सर्वांनाच मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच कारख्यांचा गळीत हंगाम सुरु झाला असताना ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या या रस्त्याने जात असतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी होताना दिसते. यामुळे होणारे गंभीर अपघात, त्यात होणारे गंभीर जखमी हे सतत चालू होते. त्यामुळे खालपासून वरिष्ठ पातळीवर सर्वच स्तरावरून हा रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी होती. पण ती पूर्ण होत नव्हती. 

दरम्यान, सदर कामानंतर या रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनींना सोन्याचे मोल येणार आहे. या मार्गावर आता पेट्रोलपंप, हॉटेल व्यवसाय वाढवून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. शिर्डीला आलेला भाविक बहुधा शनी शिंगणापूरला येतच असतो. विमान, रेल्वेने येणारे भाविक अवघ्या १ तासातच शनीशिंगणापूरला पोहचतील. त्यामुळे हा चौपदरी महामार्ग विकासाचा महामार्ग ठरणार आहे.