Breaking News

पतंजली उद्योग समूहाला दिलेली जागा नियमानुसारच


मिहान प्रकल्पात पतंजली उद्योग समूहाला दिलेली जागा ही नियमानुसारच देण्यात आली असल्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.सदस्य संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला श्री. येरावार उत्तर देत होते. मिहान प्रकल्पातील जागा ही केंद्र सरकारची नसून राज्य शासनाने अधिग्रहित केलेली आहे. पतंजली उद्योग समूहाला सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र ) मध्ये 106.11 एकर तर सेझ बाहेरील क्षेत्रामध्ये 234.15 एकर अशी एकूण 340.26 एकर जागा देण्यात आली आहे.
विशेष आर्थिक क्षेत्रातील विकसित भूखंड हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या बोर्डाने मंजूर केलेल्या नियोजित दराने देण्यात येतात. त्याच दराने पतंजली उद्योग समूहाला सेझमधील भूखंड देण्यात आलेला असल्याचे श्री. येरावार यांनी सांगितले.

विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील भूखंड हे ई-निविदा पद्धतीने देण्यात येतात. मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील सुमारे 234 एकरचा भूखंड वितरित करण्यासाठी ई-निविदा पद्धतीने पुरेसा वेळ देऊन आणि 2 वेळा निविदा काढूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा आलेल्या प्रतिसादानुसार निविदा उघडून एकमेव आलेल्या पतंजली उद्योगसमूहाच्या निविदेची पात्रता तपासून पतंजली उद्योग समूहाला हा भूखंड वितरित करण्यात आला असल्याचे श्री. येरावार यांनी सांगितले.