Breaking News

चायना मांजा बनविणार्‍या कारखान्यावर बंदी आणावी.

अहमदनगर/प्रतिनिधी। महाराष्ट्रात चायना मांजावर बंदी असताना देखील नगर शहरात अनेक ठिकाणी चायना मांजा बनविण्याचे कारखाने राजरोसपणे सुरु असून, त्याकडे मनपा डोळेझाक करते. तरी या कारखान्यावर तात्काळ बंदी आणावी,  अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रान्वये केली आहे.


पत्रात म्हटले आहे की, भारतामध्ये आपण मेक इन इंडियाची सुरुवात केली, परंतु अजूनही सर्व ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली नाही. महाराष्ट्र, गुजरात व इतर ठिकाणी मकर संक्रांत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामध्ये लाखो - करोडो रुपयांची उलाढाल होते, तरुणाई मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. परंतु सण साजरा करताना काही सामाजिक भानसुद्धा जपायला हवे आहे.

महाराष्ट्रामध्ये चायना (नायलॉन) मांजावर बंदी आहे. काही महानगरपालिका याबाबत कडक कारवाई करतात तर काहींना देणे - घेणे नाही. त्यातली एक म्हणजे अहमदनगर शहरातील महानगरपालिका. मी स्वत: दोन - तीन वेळेस महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. परंतु नावापुरती कारवाई होताना दिसत आहे. चायना मांजामुळे मोठ-मोठे अपघात होतात तर काहींचे जीवही यामध्ये जाण्याची शक्यता आहे. तर काहीचे गेले आहेत.पशु-पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होते. त्याबद्दल वरवरची हळहळ व्यक्त होते. चायना मांजा बनवणार्‍या व विकणार्‍या कंपनी अथवा कारखान्यांवर बंदी आणून त्यांचे परवाने आपण रद्द करावे, जेणेकरुन ठोस कारवाई होइल आणि तरीदेखील हा प्राणघातक चायना मांजा बाजारामध्ये विक्रीस आणला, त्यांचे शॉप क्ट परवाने रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.