Breaking News

मुंबई पोलिस आयुक्त- आमदारांमध्ये सकारात्मक चर्चा शहर इलाखाच्या भ्रष्ट टोळीत पसरली अस्वस्थता.

मुंबई/विशेष प्रतिनिधी :- शहर इलाखा शाखेतील गैरव्यवहारासंदर्भात कफ परेड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी करून दोषींवर निश्‍चित कारवाई केली जाईल असे आश्‍वासन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. पोलिस आयूक्तांनी पारदर्शकपणे यात लक्ष घालून संघटीत गुन्हेगारीचे कृत्य उघड करण्यासाठी प्रयत्न केले तर तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह अन्य भ्रष्ट अभियंत्यांचे पितळ उघडे पडेल आणि साबांची दरोडेखोर टोळी चव्हाट्यावर येईल असा विश्‍वास आ. चरणभाऊ वाघमारे यांनी आयूक्तांच्या भेटीनंतर लोकमंथनशी बोलतांना व्यक्त केला.



मनोरा आमदार निवास इमारतीतील कक्षांत 2014 मध्ये प्रस्तावित असलेल्या दुरूस्तीच्या कामात प्रचंड गैरव्यवहार झाला असून साबां पातळीवर त्याची दखल न घेतली गेल्याने आ. चरणभाऊ वाघमारे यांनी 21 नोव्हेंबरला कुलाबा उपनगरातील कफ परेड पोलिस ठाण्यात शहर इलाखा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, सहअभियंता भुषण फेगडे, केशव धोंडगे या संशयितांविरूध्द तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावर पंधरा दिवसात कफ परेड पोलिसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही. 

साबां प्रशासनाप्रमाणे कफपरेड पोलिस ठाणेदेखील एखाद्या अज्ञात शक्तीच्या दबावाखाली येऊन या संशयीतांवर कारवाई करण्याचे टाळत असल्याचा संशय आ. चरणभाऊ वाघमारे यांच्यासह अन्य सहकारी आमदारांना आहे. म्हणूनच आमदारांच्या या शिष्टमंडळाने आज गुरूवार दि.7 डिसेंबर 2017 रोजी पोलिस आयूक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेट घेवून या प्रकरणात हस्तक्षेप करून जनतेच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची विनंती केली. 

या भेटीत पोलिस आयूक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीसोबत पुराव्यांची शहनिशा करून संशयीतांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलिस आयूक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी दिल्याचे आ.चरणभाऊ वाघमारे यांनी दै.लोकमंथनशी बोलतांना सांगितले.

या प्रकरणात साबांने प्राथमिक स्तरावर चौकशीचा फार्स करून केवळ आठ कक्षांत गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालात नमूद केले असले तरी या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असून प्रकरण गंभीर आहे. कोट्यवधींचा हा घोटाळा संघटीत गुन्हेगारीचा प्रकार असून यात संगनमत केलेल्या सर्व संशयीतांचा सहभाग लक्षात घेऊन गंभीर कलमांखाली फौजदारी गुन्हे दाखल होणे अपेक्षित असल्याचे पोलिस आयूक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आ. चरणभाऊ वाघमारे यांनी सांगीतले.

पोलिस आयुक्तांनी सकारात्मक चर्चा करून गुन्हेगारांना शासीत करण्याची कायद्याची भुमिका मान्य केली. गैरव्यवहारात सहभागी असलेल्या मंडळींवर कारवाई होण्याच्या प्रक्रियेला या भेटीने वेग येईल अशी अपेक्षा आ. चरणभाऊ वाघमारे यांनी व्यक्त केली. दरम्यान या भेटीचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर शहर ईलाखा शाखेत वेगवेगळ्या शक्यतांना ऊत आला होता. तर भ्रष्ट लॉबीत अस्वस्थता पसरल्याचे आमच्या सुत्रांकडून कळते.

उद्याच्या अंकातः फ्लाईंग स्काडच्या तपासाची दिशा अन् भ्रष्ट अभियंत्यांची दशा