Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्यावतीने केंद्रीय मंत्री अहीर यांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक, दि. 29, डिसेंबर - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी डॉक्टरांचा लोकशाहीवर विश्‍वास नसेल तर त्यांनी नक्षलवादी संघटनेत जावे. आम्ही त्यांना गोळ्या घालू ,असे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉक्टर सेलच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला.


निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, अहीर यांनी असे लाजिरवाणे वक्तव्य करून डॉक्टरी पेशाला काळीमा फासला आहे. डॉक्टर हे देवाचे दूत मानले जातात. सरकारी सेवेतील डॉक्टरांना मंत्रीच नक्षली म्हणू लागले तर त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल. रुग्णसेवा करणार्‍यांना मंत्र्यांनी हिंसक, दहशतवादी असे संबोधत असतील तर सरकारी सेवेत येण्यास डॉक्टर नकार देतील. ज्या विषयाला अनुसरून हे वक्तव्य करण्यात आले ते डॉक्टर नियमबाह्य पध्दतीने अनुपस्थित राहिले असतील तर अहीर यांनी सनदशीर मार्गाने कारवाईच्या सूचना द्यायला हव्या होत्या. त्याऐवजी डॉक्टरांनी नक्षलवादी व्हावे, गोळ्या घालतो अशी भाषा वापरणे गैर आहे. अहीर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा डॉक्टर सेलच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष डॉ. अमोल वाजे, डॉ. तुषार शिंदे, डॉ. सचिन पाटील, डॉ. नितीन वाडेकर, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. योगेश गोसावी, डॉ. तुषार पाटील आदींनी दिला आहे.