Breaking News

दीड कोटींचे बील थकले, औषध पुरवठा न करण्याचा विक्रेत्यांचा निर्णय

पुणे, दि. 17, डिसेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यासाठी औषध पुरवठा केलेल्या पुरवठादारांचे गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेने बीले अदा केली नाहीत. अंदाजे दीड कोटींची बीले थकली आहेत. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी पालिकेला औषध पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तीन ते चार दिवसात बीलांची अदागी न केल्यास पालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शशी इंटरप्रायजेसने दिला आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांची खरेदी केली जाते. पालिकेच्या भांडार विभागामार्फत औषध खरेदी केली जाते. पालिकेने औषध पुरवठादारांची बिले थकविले आहेत. बिलांची रक्कम अंदाजे दीड कोटी आहे. पालिकेने बिले थकविल्यामुळे औषधे विक्रेत्यांनी पालिकेला औषधांचा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

चिंचवड येथील शशी इंटरप्रायजेस पालिकेला स्वाईन फ्लूयचे मेडिसन पुरवित आहे. शशी इंटरप्रायजेसचे बील थकले आहे. याबाबत शशी इंटरप्रायजेसने पालिकेला वारंवार पत्र पाठवून बीले अदा करण्याची विनंती केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन ते चार दिवसात बील अदा करावे, अन्यथा पालिकेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शशी इंटरप्रायजेसने दिला आहे.

याबाबत बोलताना प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर म्हणाले, औषध पुरवठादारांची बिले थकली आहेत. भांडार विभागाने बीले लेखा विभागाकडे दिली आहेत. मुख्य लेखापाल राजेश लांडे म्हणाले, लेखा विभागाकडे बीले आली आहेत.