Breaking News

‘युटेक’च्या दुषित पाण्यामुळे नागरी आरोग्य धोक्यात

संगमनेर प्रतिनिधी ;- तालुक्यातील कौठे मलकापूर गावालगत सुरु झालेल्या युटेक शुगर प्रा. लि. साखर कारखान्याने सोडलेले सांडपाणी आणि मोलासेसचे दुषित पाणी परिसरातील विहीरी व गावतळ्यांच्या पाण्यात उतरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत कौठे मलकापूर येथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत व कारखाना आस्थापनाला कळविले. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने सदर नागरिकांनी जिल्हाधिकारी, आरोग्य मंत्री, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडे तक्रार केली. युटेक कारखान्याचे सांडपाणी येथील केटीवेअर बंधार्‍यात उतरत आहे. त्यामुळे गावच्या परिसरातील अनेक विहीरींचे तसेच कृषी विभागाने बांधलेल्या बंधार्‍यांचे पाणी दूषित झाले आहे. गावातील सर्व नागरिक आणि जनावरे हेच पाणी पित आहेत. यामुळे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ढिसाळपणाची चौकशी करण्याची मागणी अनेकवेळा करुनदेखील कोणतीही चौकशी होत नाही. या कारखान्यावर प्रदूषण महामंडळाने अद्याप कारवाई केली नाही.

या कारखान्याने मळीमिश्रित पाणी गावच्या नदीला सोडल्याने प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील वनराईसुध्दा धोक्यात आली आहे. परिणामी सतंप्त नागरिकांनी अनेक वेळा दिलेल्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. तर या दुषित पाण्यामुळे निर्माण होणार्‍या सर्व समस्यांची जबाबदारी संबंधित विभागावर राहील. या परिणामास संबंधित विभाग जबाबदार राहिल, असा इशारा देण्यात आला आहे. या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.