Breaking News

पथविक्रेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकरच पूर्ण करणार


पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियम) (महाराष्ट्र) योजना, 2017 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोन सर्वेक्षण तसेच बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकरात लवकर करण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लवकरच टाऊन वेंडिंग कमिटी (टी.व्ही.सी.) स्थापन करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शरद रणपिसे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. ते म्हणाले की, राज्यात सर्वेक्षणासाठी सर्व नगरपालिकांच्या बाबतीत जी.आय.एस. प्रणालीवर आधारित मोबाईल ॲप तयार करुन माहिती मागविण्यात येत आहे. 2 महिन्यांच्या आत सर्वेक्षण पूर्ण होईल, असे नियोजन केले आहे. उघड्यावर अन्न शिजविणाऱ्या फेरीवाल्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत 600 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यांच्या कडेला पट्टे मारुन तसेच फलक लावून जेथे फेरीवाल्यांना आपले स्टॉल लावता येणार नाही अशा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. जागोजागी नियमबाह्य फेरीवाला काढून टाकण्यासाठी वाहने ठेवण्यात आली आहेत, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.