Breaking News

विविध भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटणार - सातपुते

अहमदनगर / प्रतिनिधी :- प्रभाग 34 मध्ये पाण्याची जुनी टाकी असून, त्या परिसरात नवीन टाकी उभारण्यात आली आहे. फेज 1 अंतर्गत या दोन्ही टाक्यांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू करण्यात आले असून, एकत्रिकरण करण्यात आल्यानंतर मोहिनीनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, विद्यानगर, शीतल कॉलनी, दूधसागर सोसायटी, शास्त्रीनगर या भागातील पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.


प्रभाग 34 मधील फेज 1 अंतर्गत जुन्या व नवीन पाण्याच्या टाकीचे एकत्रिकरण करण्यात येणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या कामाची शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दीपक खैरे, संजय लोंढे, संजय कोतकर, विजय पठारे, रमेश परतानी, युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, अमोल येवले, वसंत ठुबे, मुकेश गावडे, उपशहरप्रमुख वसंत शिंदे व मंगेश शिंदे, प्रशांत भाले, अंगद महारनवर, नीलेश बनकरन वैभव पाटील आदी उपस्थित होते.

सातपुते पुढे म्हणाले की, जुन्या टाकीची क्षमता 4 लाख लिटरची होती. त्यामुळे हे पाणी अपुरे पडत असे. या टाकी शेजारीच नवीन टाकी उभारावी, ही मागणी पूर्ण करीत दुसरी 2.5 लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली. आता या दोन्ही टाक्या एकमेकांना जोडण्यात येणार असल्याने प्रभागाला एकूण 6.5 लाख लिटर पाणी मिळू शकणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघाल्याचे ते म्हणाले. या दोन्ही टाक्यांचे एकत्रिकरण करण्यात आल्याने प्रभाग 34 चा पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत धन्यवाद दिले आहेत.