Breaking News

शेतकऱ्यांना कारखान्यांच्या पहिल्या हप्त्याची प्रतिक्षा!


कुळधरण/प्रतिनिधी/- शासन निर्णयानुसार ऊस कारखान्याला गेल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर त्याचे पेमेंट जमा केले पाहिजे.परंतु कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला तरी शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नाही.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना चातकाप्रमाणे पहिल्या हप्त्याची किती रक्कम जाहीर होऊन आपल्या खात्यावर जमा कधी होईल? याची प्रतिक्षा लागून राहिलेली आहे.
शासन निर्णयानुसार एफआरपी ची रक्कम देणे बंधनकारक आहे.त्यानुसार २,५५० /-रूपये साडेनऊच्या रिकव्हरीला व पुढे वाढत जाणाऱ्या प्रत्येक टक्क्यानुसार २६८/- रुपये मिळवून पहिला हप्ता मिळणे अपेक्षित आहे.कोल्हापूर , सातारा,सांगली या जिल्ह्यात अनेक सहकारी व खाजगी कारखान्यांनी एकरकमी तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा भाव दिला आहे. जिल्हयातील सर्वच कारखान्याची रिकव्हरी सरासरी दहा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान पहिला हप्ता २,७५०/- रूपये मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
भिमा पट्ट्यातील सिध्दटेक, भांबोरा,जलालपूर,दुधोडी,बेर्डी,गणेशवाडी,खेड , औटेवाडी,बाभुळगाव,शिंपोरा या भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून येथील ऊस मोठया प्रमाणात अंबालिका शुगर दौंड शुगर,बारामती अॅग्रो या कारखान्यांना जातो. परंतु अजून पहिल्या हप्त्याचे पेमेंट जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.कारण त्याचे सर्व व्यवहार उसाचे बील आल्यावरच चालू होतात.यामुळे बाजारपेठेत देखील ही मंदी जाणवत आहेत.खत दुकानदार,किराणा,कापड,औषधे बियाणे दुकानदारही पहिला हप्ता कधी जमा होतो आहे याची वाट पाहत आहे.