Breaking News

उपसा जलसिंचन प्रकल्पांना सोलर फिडरद्वारे कार्यान्वित करा - मुख्यमंत्री


नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढविण्यासाठी सर्व अपूर्ण 16 उपसा जलसिंचन योजनांना सोलर ऊर्जा आधारित यंत्रणांनी जोडण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या योजनांची योग्य सांगड बसावी यासाठी पालक सचिवांच्या अध्यक्षतेसाठी टास्क फोर्स तयार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा त्यांनी आज बैठकीत घेतला. या बैठकीला आदिवासी विकास तसेच वन राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मल्लीक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुप कुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात 78 टक्के भूभाग वनाखाली असल्याने सिंचन प्रकल्पांवर मर्यादा आहेत यात 16 उपसा जलसिंचन प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. यासाठी पालक सचिवांनी विविध विभागांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. या केंद्रांच्या वीज बिलाचा प्रश्न भविष्यात निर्माण होईल हे लक्षात घेऊन याला सोलर विजेद्वारे पुरवठा द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले, अशा सोलर फीडरसाठी वनखात्याची 1 हेक्टर पर्यंत जमीन देता येणे शक्य आहे, त्यामुळे या सर्व प्रकल्पातून सिंचन सुरू होणे शक्य आहे.