Breaking News

धनगर समाजाची जागा बळकाविण्याचा संजय पाटील यांचा डाव - प्रकाश शेंडगे

सांगली, दि. 25, डिसेंंबर - धनगर समाजाच्या विकासासाठी आरक्षित असलेले 2200 एकर जागा ’ड्राय पोर्ट’ व ’फूड पार्क‘ उभारण्याच्या नावाखाली हडप करण्याचा भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार संजय पाटील व अन्य नेत्यांचा डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत केला. संबंधितांनी या जागेचा नाद सोडावा. अन्यथा, संपूर्ण राज्यातील धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

संजय पाटील यांच्या पुढाकाराने कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेळी- मेंढी विकास महामंडळाच्या 2200 एकर जागेवर ’ड्राय पोर्ट’ व ’फूड पार्क‘ उभारणीचा प्रस्ताव आहे. मात्र या प्रस्तावाला प्रकाश शेंडगे यांनी तीव्र विरोध करण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाच्या हक्काच्या जागेवर क ोणालाही अतिक्रमण करू दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या पत्रकार बैठकीस धनगर समाजोन्नती मंडळाचे सांगली जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष अजित दुधाळ, मिरज तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर मेटकरी व सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष पोपट कोळेकर आदी उपस्थित होते.