Breaking News

रस्ते विकासाच्या सव्वा चारशे कोटींच्या कामात 63 कोटींवर डल्ला - योगेश बहल

पुणे, दि. 21, डिसेंबर - रस्ते विकासाच्या 425 कोटींच्या कामामध्ये रिंग झाली आहे. 425 कोटींच्या रस्ते विकासांच्या कामामधून अधिकारी, पदाधिका-यांनी संगनमत करुन करदात्यांच्या सुमारे 63 कोटीं रुपयांवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला. केवळ राष्ट्रवादी भ्रष्टाचारी असल्याचे खोटे-नाटे सांगत भाजपने भ्रष्टाचार सुरु केला असून या गैरकारभाराला पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर देखील जबाबदार आहेत, असाही आरोप बहल यांनी केला आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाविष्ट गावांसह शहराच्या विविध भागातील रस्त्यांच्या विकासासाठी स्थायी समितीने मागील सभेत 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. परंतु, या कामांमध्ये रिंग झाल्याचा आरोप केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी रस्ते कामांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विरोधी पक्षनेत्याच्या दालनात बोलताना बहल पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात कमी दराने निविदा भरल्या जात होत्या. आता भाजपच्या राजवटीत मात्र दोन ते तीन टक्के कमी दराने निविदा भरल्या जात आहेत. तथापि, अपेक्षित दर जास्त आहे. त्यामुळे रस्ते विकासातून तब्बल 63 कोटी रुपयांवर पदाधिकारी व अधिका-यांनी डल्ला मारला आहे.