Breaking News

साक्रीनजीक प्रशिक्षणार्थी विमान कोसळून 5 जण जखमी

धुळे, दि. 02, नोव्हेंबर - धुळे जिल्ह्यातील साक्रीनजीकच्या शेवाळी फाट्याजवळ तांत्रिक बिघाडामुळे प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात वैमानिकासह एकूण 5 जण किरोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार गुजरातमधील सूरतहून धुळ्याकडे जाणा-या बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षणार्थी विमानाचे आज, शुक्रवारी संध्याकाळी 7.45 वाजता साक्रीमधील शेवाळी फाट्याजवळ असलेल्या दातर्ती गावाजवळ क्रॅश लँडिंग झाले. यामध्ये पायलटसह पाचजण प्रशिक्षणार्थी होते. या प्रशिक्षणार्थीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलट जे. पी. शर्मा यांनी तात्काळ विमान नागरी वस्तीपासून दूर नेले. 

त्यामुळे पायलट जे. पी. शर्मा यांनी वेळीच दाखवलेल्या या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात पायलट जे. पी. शर्मा किरकोळ जखमी झाले असून बाकीचे प्रशिक्षणार्थी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातानंतर घटनास्थळी गावक-यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. दरम्यान, पायलट जे.पी. शर्मा यांना प्राथ मिक उपचारांसाठी साक्री येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.