Breaking News

रावण टोळीतील आणखी पाच सदस्यांना पोलिसांकडून अटक

पुणे - जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी रावण टोळीच्या पाच सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 


चेतन राजू कणसे (वय 20 रा. मारणे चाळ, बालघरे वस्ती, चिखली, मूळ रा. उंबरविहिर ता.पाटोदा जि.बीड) सूरज चंद्रदत्ता खपाले (वय 19 रा.शिवाजी चौक,चिखली,पुणे मूळ रा. जावळीप्लॉट, बार्शी जि.सोलापूर) रुतिक रतन रोकडे उर्फ मुंग्या (वय 18 रा.चिंतामणी नगर रोकडे वस्ती चिखली) या तिघांना मुकाई चौक देहूरोड येथून ताब्यात घेतले तर मनोज शेषेराव हाडे (वय 19 रा.गणेश नगर लक्ष्मी रोड चिखली) अक्षय गोपीनाथ चव्हाण (वय 21 रा.महालक्ष्मी ) या दोघांना पोलिसांनी यांना चाकण येथून अटक केली.

जबरीचोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना वरील तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या आरोपींनी कारमधून येऊन पायी निघालेल्या संदीप उमेश कुलकर्णी यांना शिक्रापूरला जाण्याचा रस्ता विचारला. पुढे रस्त्यात सोडतो असे सांगून कुलकर्णी यांना कारमध्ये बसवले. पुढे गेल्यानंतर कुलकर्णी यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील अंगठी, सॅमसंग मोबाईल व पर्स असा 22 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. 

त्यानंतर त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून कुलकर्णी यांना गाडीतून बाहेर काढले. या गुन्ह्याचा तपास करताना हे पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडी, जबरी चोरी असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पांढ-या रंगाची स्विफ्ट डीजायर गाडी जप्त केली आहे.