Breaking News

सांगलीत 17 डिसेंबरला शेतकरी पेन्शन परिषद

सांगली, दि. 03, डिसेंबर - वृध्द शेतकरी, शेतमजूर व कष्टक-याला दरमहा दोन हजार रूपये पेन्शन मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारण्यासाठी दि. 17 डिसेंबर रोजी सांगली येथील तरूण भारत व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर शेतकरी पेन्शन परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली.


शेतक-याची 10- 20 एकर शेती असली तरीही त्याला वृध्द झाल्यानंतर फारसे कोणी सन्मानाने सांभाळत नाही. या वृध्दांना हक्काने जगता यावे, यासाठी दर महिन्याला किमान दोन हजार रूपये तरी पेन्शन राज्य शासनाने दिली पाहिजे. केरळ व गोवा राज्यातील शेतक-यांना अशा पध्दतीने पेन्शन दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य शासनानेही शेतकरी, शेतमजूर व कष्टक-याला 60 वर्षे वयानंतर दर महिन्याला दोन हजार रूपये पेन्शन दिली पाहिजे, या मागणीसाठी जनता दलाचा लढा सुरू आहे.
या मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार जनता दलाने केला आहे. त्यासाठी सांगली येथे दि. 17 डिसेंबर रोजी शेतकरी पेन्शन परिषद आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अशी पेन्शन परिषद घेण्याचे नियोजन केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुंबई येथे राज्यातील सुमारे 60 हजाराहूनही अधिक शेतकरी जमा होऊन तीव्र आंदोलन उभारणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा करणार आहेत. राज्य शासनाने या मागणीबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही प्रा. शरद पाटील यांनी सांगितले.