कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नीतांवात 14 जणांचा मृत्यू
मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरूवारी रात्री 12.30 वाजता भीषण आग लागली. काही कळण्यापूर्वीच आगीचे स्वरुप पसरत गेले.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्स आले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास दलास यश आले. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचे मोेठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी हॉटेल वन अबव्हच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दुर्घटनेत प्रमिला, तेजल गांधी (वय वर्षे 36), खुशबू बन्सल, विश्वा ललानी (वय वर्षे 23), पारुल लकडावाला (वय वर्षे 49), धैर्य ललानी (वय वर्षे 26), किंजल शहा (वय वर्षे 21), कविता धरानी (वय वर्षे 36), शेफाली जोशी, यशा ठक्कर (वय वर्षे 22), सरबजीत परेला, प्राची खेतानी (वय वर्षे 30), मनिषा शहा (वय वर्षे 47), प्रीती राजगीरा (वय वर्षे 41) यांना प्राण गमावावे लागले आहेत. या परिसरात असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ, झूम आणि टीव्ही 9मराठी या वृत्तवाहिनींच्या प्रसारणांवरही परिणाम झाल्याने काही कार्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलीस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, कमला मिलमध्ये लहान जागा असतांना देखील येथे 96 उपहारगृहांना परवानगी दिलीच कशी असा जाब विचारत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. काल रात्री या भागात लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले. कमला मिल कम्पाऊंड या परिसरात 96 रेस्तराँ आहेत. या उपहारगृहांचे फायर ऑडिटही झाले नव्हते. पब आणि रेस्टॉरंट मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती ओढावल्याचेही त्यांनी ट्वीट केले आहे.