Breaking News

श्रीगोंद्याची राजकीय गणिते दिशाहीन! विकसनशील तालुक्याची ओळख कायम


जिल्ह्यात सर्वात दुष्काळी तालूका म्हणून ज्या तालुक्याची ओळख होती, त्या श्रीगोंदा तालुक्याला कुकडी, आढळा आदी धरणांमुळे विकसनशील तालुक्याचा दर्जा मिळाला. दक्षिणेतील सर्वात दुष्काळी असा हा तालूका येथील जेष्ठ मार्गदर्शक आणि चळवळीचा पिंड असलेल्या स्व. बाबुराव भारस्कर यांच्या योगदानातून या तालुक्याला विकासाची वाट पहायला मिळाली. मात्र या तालुक्याचे राजकारण काहीसे दिशाहीन झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे एक विकसनशील तालुका अशीच श्रीगोंद्याची ओळख आजही कायम आहे.

श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात राजकीय धोरणं नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात. तालुक्याच्या दिग्गज पुढाऱ्यांनी ठरविल्यास या भागाचे नंदनवन होईल. मात्र इच्छाशक्तीअभावी केवळ विकसनशील असलेल्या या तालुक्याला वैभवाचे दिवस कधी पाहायला मिळतील, हा या भागातील जनतेचा सवाल आहे. दरम्यान, सलग पाच पंचवार्षिक सत्तेत राहिलेल्या माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सध्या पायाला भिंगरी बांधली असून सर्वसामान्य लोकांची मने जिंकण्यात त्यांचा नेहमीच हातखंडा आहे. 


वेळोवेळी राजकीय पक्ष बदलूनसुद्धा मंत्रीपदाचे अढळ स्थान अबाधित ठेवणाऱ्या पाचपुतेंना आमदारकी गमावल्याचे शल्य बोचत आहे. स्व. कुंडलिकराव जगताप यांनी गनिमी कावा करून नागवडेंसहीत तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ‘बारामती पॅटर्न’चा वापर करून आपल्या तंबूखाली उभे केले. आर्थिक रसद, सर्वसामान्यांची ताकद आणि प्रचंड आत्मविश्वास या जोरावर आमदारकी न जिंकू शकलेले कुंडलिकराव तालुक्याच्या विद्यमान आमदाराचे ‘निर्माणकर्ते’ झाले. अर्थात यात ते खूप समाधानी होते. आ. राहुल जगताप यांना सध्या सहनुभूतीच्या लाटेच्या जोरावर फायदा उचलता येईल. परंतु, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला दुखवून चालणार नाही.

तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता नागवडे हे घराणेशाहीच्या थाटात असून साखर कारखान्याच्या जीवावर त्यांनी आपली मदार कायम ठेवली आहे. अनुराधा नागवडे या सध्या जनतेच्या संपर्कात आहेत. परंतु त्यांचा जनसंपर्क तेवढाच कमी आहे. जिल्हा परिषदेचे महत्वाचे पद असूनसुद्धा त्यांना तालुक्यातील तळागाळातील जनतेजवळ अजूनही जाता आलेले नाही.

नाहटा, शेलार आऊट ऑफ रेंज!
बाळासाहेब नाहटा सध्या राजकीय अज्ञातवासात आहेत. सर्वसामान्य लोकांना ताकत न देता त्यांची फसवणूक करून नाहटा यांनी सामान्यांना अर्ध्यावर सोडलं आहे. सध्या त्यांच्याजवळील ‘पिलावळ’ खोटारडेपणाची भूमिका घेत आहेत. ‘तारीख पे तारीख’ देऊन लोकांमध्ये नाराजीचे वातावरण नाहटा यांनी निर्माण केले आहे. कोणीही फोन केला तरी ते सध्या ‘आउट ऑफ रेंज’ असतात. अण्णा शेलार यांनी उपाध्यक्षपद भोगूनसुद्धा स्वतःच्या गावात सरपंचपद गमावलेल्या अण्णांची ‘सरळ आणि कडक’ टोपी जनतेने ‘वाकडी’ केली. घनश्याम शेलारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेचे नेते म्हणून घेणे पसंत केले. त्यांचा तालुक्यातील जनतेशी फारसा संपर्क नसून ‘छोटे मियाँ बडे मियाँ’ असा कार्यक्रम सुरु आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा