Breaking News

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सुवर्णयुग आणि सतेजची बाजी

पुणे, दि. 22, नोव्हेंबर - जिल्हा स्तरीय खुला गट (पुरुष व महिला) अंजिक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या रोमहर्षक वातावरणात उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने संपन्न झाले. पुरुष गटात सतेज संघ बाणेरने अंतिम सामन्यात ओम साई चिखली संघास एकतर्फी नमवून विजयी चषकावर आपले नाव कोरले. तर महिलांमध्ये सुवर्णयुग पुणेने बाजी मारली.


अंतिम सामन्यात सतेज संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत पहिल्या डावात 14 गुणांची आघाडी मिळवली. दुसर्‍या डावात ओमसाईच्या शिवराज जाधव आणि संकेत गावडे यांनी थोडी कुमक दाखवत सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. दुसर्‍या डावातही सतेजने 11-2 असे गुण मिळवून तब्बल 23 गुणांनी अंतिम सामना जिंकला.


महिला गटातील अंतिम सामना राजमाता जिजाऊ विरुद्ध सुवर्णयुग संघ पुणे यांच्यात झाला. सुरुवातीपासूनच सामना अटीतटीचा झाला. पहिल्या डावात दोन्ही बाजूने आघाडी मिळवण्याची जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली. मात्र सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबच्या चिवट सांघिक खेळाच्या जोरावर पहिल्या डावात सुवर्णयुगने 11-14 गुणांसह 3 गुणांची आखाडी मिळवली. दुसर्‍या डावात राजमाता संघाने जोरदार प्रतिउत्तर देऊन 11-11 गुणांसह बरोबरी साधली मात्र केवळ 3 गुणांच्या आघाडीने सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबने अंतिम सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा