मंदिरे वाचविण्यासाठी नगरमध्ये कृती समितीची स्थापना.
अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली व रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाने वेगाने सुरू केली आहे.मात्र मनपाने धार्मिक स्थळांचे केलेले सर्व्हेक्षणच चुकीचे असल्याचा आरोप करीत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध सुरू केला आहे.शहरातील मंदिरे वाचविण्याच्या हेतूने एका कृती समितीची स्थापना करून कारवाईच्या विरोधात उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील 1960 नंतर बांधण्यात आलेली व वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई केली जात आहे.प्रचंड पोलीस बंदोबस्त बरोबर घेऊन होणारा विरोध मोडून काढीत कारवाई केली जात आहे.आतापर्यंत कारवाईच्या दुस-या टप्प्यात 68 पैकी फक्क 17 धार्मिक स्थळे पाडण्यात आली आहेत.
51 धार्मिक स्थळे काढणे बाकी आहे.दरम्यान न्यायालयाने 17 नोव्हेंबरपर्यत या कारवाईसाठी मनपाला मुदत दिली आहे.एकीकडे मंदिरे पाडण्याला वाढणारा विरोध व दुसरीकडे न्यायालयाने दिलेली मुदत अशा कात्रीत मनपा प्रशासन सापडले आहे.या दरम्यान शहरातील मंदिरांचा महापालिकेने केलेला सर्वे चुकीचा असल्याचा आरोप करीत अनेक धार्मिक संघटनांनी कारवाईला विरोध केला आहे.
नगर शहरातील गौरीघुमट परिसरातील तुळजाभवानी मंदिराच्या समोर वसंत लोढा व सदाभाऊ शिंदे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. तसेच महापालिकेने बेकायदेशीरपणे काही ठिकाणी खासगी जागेत असणारी मंदिरे पाडल्याचा आरोप करीत हिंदु राष्ट्र सेनेसारख्या संघटनांनी कागदपत्रे जमवून मनपा आयुक्त, उपायुक्त, नगररचना अधिकारी,अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख आदींच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्याची तयारी केली आहे.
