पादुका दौर्यासंदर्भात बोलविलेली बोलविलेल्या विश्वस्त व ग्रामस्थ बैठक निर्णयाविना गुंडाळली
शिर्डी- साई समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने बाबांच्या प्रचाराखाली देशभरात मिरवित असलेल्या मुळ पादुका दर्शनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी दि.13 नोव्हेंबर रोजी संस्थान प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांमध्ये एकमत न झाल्याने यांवर अंतीम निर्णय आज ठरविणार असल्याचे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी सांगितले.
दरम्यान, मुळ पादुका दर्शन सोहळ्यात दिल्लीत झालेल्या गैरप्रकारामुळे शिर्डी ग्रामस्थांच्या भावनेला ठेच पोहचली होती. त्या पार्श्वभुमीवर दि.5 नोव्हेंबर रोजी ग्रामस्थ व छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केले होते. मात्र अध्यक्ष डॉ. हावरे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी डॉ. हावरे यांनी ग्रामस्थांना येत्या 13 तारखेस ग्रामस्थांबरोबर बैठक ठेऊन त्या बैठकीत जो निर्णय होईल तो आपणास सर्वमान्य राहील असे सुतोवाच केले होते.
त्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता बैठक सुरू झाली. या बैठकीस साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, जेष्ठ नागरीक रावसाहेब गोंदकर, मुकूंदराव कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, भानुदास गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके, कमलाकर कोते, नितीन कोते, संजय शिंदे, रविंद्र गोंदकर, सर्जेराव कोते, शिवाजी गोंदकर, गणपत गोंदकर, आप्पासाहेब कोते, राजेंद्र शिंदे, रामराव शेळके, सुजित गोंदकर, रमेश गोंदकर, गजानन शेर्वेकर, सचिन शिंदे, राकेश कोते, सचिन चौगुले, अमोल गायके, भाऊ शिरगावकर, साईराज कोते आदींसह छत्रपती शासनाचे शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रथम डॉ. हावरे यांनी ग्रामस्थांना काही सुचना करून म्हटले एका व्यक्तीने आपले मत मांडावे. असंविधानिक शब्दांचा वापर टाळावा. मी सर्व ग्रामस्थांचा आदर करतो तसेच आपण चर्चेतून तोडगा काढू अशी विनंती केली. यावेळी ज्येष्ठ नागरीक मुकूंदराव कोते म्हणाले, गेल्या महिन्यापासून बाबांच्या पादुकांचे जे काही प्रदर्शन मांडले आहे हे मला मान्य नाही. बाबा भिकारी नाही, माझा पादुका दर्शन दौर्यासाठी विरोध असून पादुका दर्शनाचा कार्यक्रम थांबविला नाही तर आत्मदहन करेल असा ठणठणीत इशारा साई संस्थानला यावेळी दिला.
अभय शेळके म्हणाले ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भावना बरोबर असून शताब्दी सोहळ्यानिमित्त मतभेद दिसून येत आहे ही खेदजनक बाब असल्याचे म्हटले. डॉ. सुरेश हावरे म्हणाले, ग्रामस्थांच्या सूचनेनुसारच पादुका दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जगभरात साईबाबांच्या भक्तांची संख्या 25 कोटींच्या घरात आहे. शिर्डीत दरवर्षी 2 कोटी भक्त येतात. त्यामुळे बाकीच्या भक्तांपर्यंत बाबा पोहोचावे व त्यांनाही दर्शन मिळावे हा हेतू होता. पादुका दर्शनासाठी देशातून 150 पेक्षा जास्त ठिकाणांहून नोंदणी झाली आहे. त्यापैकी 71 ठिकाणचा दौरा निश्चित करण्यात आला असल्याचे सांगुन हा दौरा रद्द झाल्यास आयोजन कर्त्यांच्या भावना दुखावतील व आपली फसवणुक केली असा संस्थानवर आरोप होईल असेही त्यांनी सांगितले.
कैलास कोते म्हणाले, पादुका दौर्यासंबंधी तिन महिन्यापुर्वी ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यावेळी बहुतांशी ग्रामस्थांनी पादुका दर्शनासाठी होकार दर्शविला. त्यानुसारच कार्यक्रमाची बांधणी संस्थानने केली होती. यावेळी पादुका रथाच्या पुजेसाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. गोव्यात झालेला पादुका दर्शनाचा सोहळा नयनरम्य ठरला असल्याचे कोते यांनी सांगितले. नितीन कोते यांनी प्रस्तावित 71 ठिकाणच्या पादुका दौर्याविषयी सहमती दर्शविली मात्र मुळ पादुका न नेता चांदीच्या पादुका न्याव्यात असे सुचित केले.
कमलाकर कोते म्हणाले, ग्रामस्थांच्या सुचनेचा आदर करतो. 16 गुठ्यांत पादुका दर्शनासाठी ठेवण्यावर दुमत नाही. मात्र दिल्लीत घडलेल्या अनुचित प्रकाराबद्दल विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर कारवाई करा तसेच या प्रकारात निष्कारण कर्मचार्यांना बळी ठरवू नका. असे सांगून ज्या लोकांना पादुका दर्शनाचा शब्द दिला आहे त्यांच्या भावनेचा आदर करून पादुका दर्शनासाठी न्याव्यात असे सांगितले. यावेळी विश्वस्त वाकचौरे यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांवर उत्तर देतांना म्हटले मी 2001 पासून ते आत्तापर्यंत गेल्या 18 वर्षापासून आपल्या सर्वांना अनुभवत आहे.
दिल्लीत झालेला प्रकाराबद्दल गैरसमज दुर करतांना म्हणाले विमानतळावरील भक्ताच्या डोक्यावर असलेल्या पेटीत पादुका नव्हत्या. त्या ऐका कापडी पिशवीत हातात घेतल्या होत्या. तसेच त्यानंतर दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन मध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आले असल्याचे सांगुन झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. सचिन कुलकर्णी यांनी विश्वस्तांवर व कर्मचार्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही पाहिजे, असे बोलताच ग्रामस्थांनी आक्रोश करत कुलकर्णीवर ताशेरे ओढले. यावेळी तु तु मै मै बघावयास मिळाले. अखेरीस ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यावर साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी यावर आज निर्णय घेऊ, असे सांगून बैठक तहकूब करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
