Breaking News

गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली


बंगळुरू : 'ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून, येत्या काही आठवड्यांतच त्यांना अटक केली जाईल,'अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.
'या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या 'एसआयटी'ला (विशेष तपास पथक) मारेकऱ्यांचे काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. हे पुरावे योग्य वेळी जाहीर केले जातील,' असे रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले आहे.

 'हा खून कुणी व का केला? याची अद्ययावत माहिती 'एसआयटी'ने मला दिली आहे. याविषयी मी त्यांचा आभारी आहे. ही माहिती मी आता जाहीर करू शकत नाही. मात्र, गौरी यांचे मारेकरी १०० टक्के पकडले जातील.

ही कारवाई येत्या काही आठवड्यांतच केली जाईल,' असे ते बंगळुरू प्रेस क्लबने आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले. रेड्डी यांना यावेळी गौरी यांची 'डाव्या'किंवा 'उजव्या' विचारसरणीच्या समर्थकांनी हत्या केली काय, असा प्रश्न केला असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. 

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हत्या करणाच्या तपासासाठी पोलीस महानिरीक्षक बी.के. सिंग यांच्या नेतृत्वातील एक एसआयटी स्थापन करून मारेकऱ्यांच्या शिरावर तब्बल १० लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली होती.