पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी मिडी बस बालेवाडीच्या आगारात
पुणे, दि. 12, नोव्हेंबर -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात महिन्याभरात 200 पहिल्या 7 बस ताफ्यात दाखल होण्यासाठी बालेवाडीच्या आगारात आल्या असून त्यांना ताफ्यात दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
त्यामुळे पुढील काही दिवसात या बस पुण्याच्या रस्त्यावर धावताना दिसतील. येत्या महिन्याभरात 200 मिडी बस दाखल होणार असून आठवडाभरात पहिल्या काही गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी बालेवाडीच्या आगारात पोचल्या आहेत.
या बससाठीचे मार्ग, त्यावरील बसस्थानके निश्चित करण्यात आली आहेत. पीएमपीच्या ताफ्यात यापूर्वी उपलब्ध असलेल्या मिडी बस शहराच्या मध्यवस्तीतील रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, महात्मा फुले पेठ, सदाशिव पेठेत सेवा पुरवित होत्या. मात्र, काही काळानंतर या बस वगळल्याने संबंधित मार्ग बंद झाले होते.
आता पुन्हा पीएमपीच्या ताफ्यात मिडी बस दाखल होत असल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या बस खरेदीसाठीची 25 टक्के रक्कम पीएमपीने यापूर्वीच दिली असून उर्वरित रक्कम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिली आहे.