Breaking News

सिंधुदुर्गातील 3361 शेतकर्‍यांकडे 19 लाखांची थकबाकी

सावंतवाडी, दि. 12, नोव्हेंबर - थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना जाहीर केली आहे. योजनेत पात्र होण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार असून मार्च 2017 अखेर असलेल्या मूळ थकबाकीचे पाच ते दहा सुलभ हप्ते पाडून दिले जाणार आहेत. 


वीजबिल वसुलीत कायम अग्रेसर राहणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3361 शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे मार्च 2017 अखेरीस 19 लाख 61 हजारांची वीजबिल थकबाकी असून एप्रिलनंतर दिलेल्या चालू त्रैमासिक बिलापोटी 15 लाख 59 हजार 881 रुपये येणे आहे. ती भरून शेतकर्‍यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3361 थकबाकीदार कृषीपंपधारकांकडे मार्च 2017 अखेरीस मूळ थकबाकीचे 18 लाख 9 हजार 54 रुपये, व्याजाचे 1 लाख 32 हजार 253 रुपये तर दंडापोटी 19 हजार 782 रुपये अशी एकूण 19 लाख 61 हजार 89 रुपये थकबाकी आहे. एप्रिलनंतरच्या चालू बिलापोटी 15 लाख 59 हजार 881 रुपये भरावे लागतील. 15 नोव्हेंबरपर्यंत चालू बिले भरणार्‍यांनाच कृषीसंजीवनी योजेनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. 

मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या व दंड-व्याज बाजूला ठेवून मार्च 2017 अखेर 30 हजारापेक्षा कमी मूळ थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांना थकबाकीचे पाच समान हप्ते दिले जाणार आहेत. प्रत्येक हप्ता 20 टक्के रकमेचा असून पहिला हप्ता डिसेंबर 2017, दुसरा मार्च 2018, तिसरा जून 2018, चौथा सप्टेंबर 2018 ला तर पाचवा हप्ता डिसेंबर 2018 पर्यंत भरावा लागणार आहे. 

या प्रत्येक हप्त्यासोबत पुढील काळात येणारे चालूबिल भरणेही क्रमप्राप्त आहे. ज्यांच्याकडे तीस हजारांहून अधिक मूळ थकबाकी आहे, त्यांना मूळ थकबाकीचे प्रत्येकी 10 टक्के रकमेचे दहा हप्ते मिळणार आहेत. संपूर्ण हप्ते व चालूबिलाचा भरणा डिसेंबर 2018 पूर्वी व दिलेल्या मुदतीत केल्यास थकबाकीवर आकारलेले दंड व व्याज माफ होणार आहे.