Breaking News

रत्नागिरीच्या विक्रीकर आयुक्तांना जीएसटी संदर्भातील समस्या सादर

रत्नागिरी, दि. 12, नोव्हेंबर - जीएसटी संदर्भात संगणकीय अडचणींबाबत जिल्हास्तरीय कर सल्लागार संघटनेतर्फे येथील विक्रीकर आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली. या वेळी विविध समस्या अध्यक्ष मंदार गाडगीळ व अन्य पदाधिका-यांनी मांडल्या. मागण्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.

वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीस चार महिने पूर्ण झाले. जीएसटीचे यश कार्यक्षम संगणक प्रणालीवर अवलंबून आहे. मात्र आजवर समाधानकारक नाही. कर कायद्यांच्या अंमलबजावणीत कर सल्लागारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बावली आहे. जीएसटी येण्यापूर्वी व नंतरही करसल्लागार संघटनेतर्फे शिबिरे, कार्यशाळा आयोजित केल्या होत्या.

 सर्व सभासद रिटर्न्स वेळच्या वेळी व बरोबर दाखल व्हावीत यासाठी रात्रंदिवस काम करत होते. यापुढेही करतील. पण अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही समस्या कायदा व नियमावलीबाबत आहेत, तर अनेक समस्या संगणक प्रणालीसंबंधात आहेत. त्यामुळे संगणक प्रणाली कशी कार्यक्षम आहे याचे प्रात्यक्षिक दाखवण्याची अपेक्षा नाही. मात्र ही प्रणाली सोपी, सुलभ, कार्यक्षम आहे हे दाखवावे. त्यासाठी संघटना माहिती देईल व येणा-या अडचणींची कल्पना आपणास येईल, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
आवश्यक जावक संबंधित सर्व माहितीचे एकच विवरण पत्रक असावे. पाच कोटीपेक्षा कमी उलाढाला असेल त्यांना तिमाही विवरणपत्रक असावे. ताळमेळासाठी संगणकप्रणाली शासनातर्फे सर्वांना मोफत मिळावी आणि वकील, करसल्लागारांना लेखापरीक्षणाचा अधिकार मिळावा तसेच संगणक प्रणाली सुधारावी, अशा मागण्या करण्यात आल्या.