Breaking News

शहीद सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा, दि. 07, नोव्हेंबर - शहीद जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर आज कराडवाडी येथे बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, पुण्याच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या तीन फैरी झाडून  तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी  अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार विवेक जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव, गट विकास अधिक ारी दिपा बापट, सुभेदार विश्‍वंभर जगदाळे, चंद्रकांत पवार यांच्यासह सैन्य दलाच्यावतीनेही कराडवाडी येथे पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
शहीद जवान सुभाष कराडे यांचे पार्थिव खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथील निवासस्थानी आज आणण्यात आले. या ठिकाणी कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या पार्थिवाचे  दर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले  होते. अमर रहे अमर रहे सुभाष कराडे अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली.
पुण्याच्या बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या 16 जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर वडील  लालासाहेब, आई छबुबाई, पत्नी पुनम, मुलगी सुप्रिया, मुलगा सुशांत व बंधू संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद सुभाष कराडे यांचा मुलगा सुशांत यांनी पार्थिवाला  मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी विविध अधिकारी, लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.